no images were found
जिल्हा नियोजन समितीतून रु.२कोटींचा निधी; क्षीरसागर यांच्याकडून मैदानाची पाहणी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियम मैदानाची गेल्या काही वर्षापासून दुरावस्था झाली आहे. निधी अभावी मैदानाची झालेली दुरावस्था यामुळे खेळाडूंच्या सरावावर विपरीत परिणाम होत आहे. मैदानाचे सपाटीकरण, खेळाडूंसाठी मुलभूत सोई सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडूनी नाराजी व्यक्त करत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत तात्काळ जिल्हा नियोजन समितीमधुन आवश्यक निधीची तरतूद करण्याची ग्वाही श्री.क्षीरसागर यांनी खेळाडूंना दिली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी स्टेडियम सपाटीकरण व इतर सोयीसुविधा करणे यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून रु.२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामाची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली. आज दुपारी श्री.क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमला भेट दिली.
सदर मैदान आठ एकरात असून येथील प्रेक्षक आसन क्षमता तब्बल दहा हजार इतकी आहे. कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या या मैदानात विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, अजित वाडेकर, कपिल देव, हनुमंतसिंग, सुनील गावस्कर, विश्वनाथ, सलीम दुराणी, फारूक इंजिनिअर, मन्सूर अली पतौडी, पांडुरंग साळगावकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा ते क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, महंमद अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू, संजय मांजरेकर यांच्यापासून ते अगदी आता भारतीय संघातून प्रतिनिधित्व करणारा सुरैश रैना अशा एक ना अनेक दिग्गजांनी सामन्या दरम्यान आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन या मैदानावर केले आहे.
याबाबत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, देशातील अनेक क्रिकेटपटूंनी या मैदानावरील खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली आहे. याच मैदानाने कोल्हापूरचे अनेक क्रिकेटपटूही राज्यासह देशालाही दिले आहेत. परंतु गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे खेळाडूना येथे सराव करणेही मुश्कील झाले आहे. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या या मैदानात पूर्वीप्रमाणे रणजी सामने सुरु व्हावेत. याकरिता आवश्यक तो निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा नियोजन समितीमधून मैदानाच्या सपाटीकरण व इतर सोयीसुविधा करण्यासाठी रु.दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात छत्रपती शिवाजी स्टेडियमकडे विशेष लक्ष देवून मैदानाचा कायापालट करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही श्री.क्षीरसागर यांनी सांगितले. यासह मैदानाचे सपाटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री.राजेश क्षीरसागर यांनी क्रीडा विभागाच्या अधिकारी वर्गाला दिल्या.
पाहणी दरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाडगे, तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे उपस्थित होते.