no images were found
कोल्हापूरचा सोहम खासबारदार उपविजेता तर मुंबईचा ओंकार कडव तृतीय
कोल्हापूर :- ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ने आयोजित केलेल्या मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न झाल्या.स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीत पहिल्या पटावर आघाडीवर असलेल्या अग्रमानांकित रेंदाळाच्या श्रीराज भोसलेने कोल्हापूरच्या प्रणव पाटील चा पराभव करून एकूण नऊ पैकी साडेआठ गुण मिळवून निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले.त्याला रोख आठ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.आत्तापर्यंत श्रीराजने चार वेळा पायोनियर चषकावर आपले नांव कोरले आहे. दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित मिरजेच्या मुद्दसर पटेलला दहावा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदार ने पराभवाचा धक्का देत आठ गुणासह उपविजेतेपद मिळविले त्याला रोख सहा हजार रुपये व चषक देऊन गौरविले.तिसऱ्या पटावर तृतीय मानांकित मुंबईचा ओंकार कडव विरुद्ध बेळगावचा अभिषेक गणीगर यांच्यातील डाव बरोबरीत सुटल्यामुळे ओंकारला साडेसात गुणासह तृतीय स्थान मिळाले त्याचा रोख चार हजार रुपये व चषक देऊन सन्मान केला.
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या सहकार्याने मंगलधामच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धा पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ने पुरस्कृत केल्या होत्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी, नितीन कुलकर्णी,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटणकर व डॉ.अभिजीत हावळ,ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम चे अध्यक्ष एडवोकेट विवेक शुक्ला सचिव श्रीकांत लिमये व रामचंद्र टोपकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर,धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे,करण परीट,सूर्याजी भोसले उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे संचालक मंडळ, व्यवस्थापक अशोक जोशी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.