no images were found
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून शनिवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवतींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यासाठी घेण्यात येत असलेला हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. या अंतर्गत दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी सुहास गाडे व भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी अन्नपूर्णा सिंग मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्राचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी व परिक्षार्थींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
जिल्ह्यात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे शंभराहून अधिक अधिकारी आहेत. हे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, स्पर्धा परीक्षेसाठी असणारी पात्रता व करावी लागणारी तयारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पध्दतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत, अशी माहिती करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यानी दिली.