
no images were found
“महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” ची सुरुवात
कोल्हापूर : नाविन्यता, कल्पकतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरु शकत नाहीत. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, संजय माळी यांनी दिली.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी व समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.
उपक्रम ३ टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. तद्नंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करु शकतील. संस्था स्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्यात करण्यात येईल. या उपक्रमाच्या नोंदणीकरीता शैक्षणिक संस्था दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये अर्ज करु शकतील. या चॅलेंजची नोंदणी करण्याकरीता www.msins.in अथवा https://schemes.msins.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्था सहभागी उमेदवारांसाठी संस्था स्तरावर सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले असून या संस्थेतील 2 संकल्पनांची निवड पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल. संस्था स्तरावरील निवडलेल्या संकल्पनांमधून १०० उत्कृष्ट संकल्पनांची निवड जिल्हा स्तरावरील सादरीकरणाकरिता करण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा स्तरावर सादरीकरण सत्राकरिता निवडलेल्या १०० नवउद्योजकांसाठी, स्टार्टअप प्रवासाच्या मुलभूत गोष्टींबद्दल माहिती व सादरीकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. जिल्हा स्तरावर निवडलेल्या १०० नवउद्योजकांना सादरीकरणाची संधी दिली जाईल. सहभागींचे मुल्यांकन ज्युरी मार्फत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या पोर्टलवर करण्यात येईल. जिल्हा स्तरावर सादरीकरण सत्रातून १० विजेते निवडले जातील. प्रत्येक विजेत्याला 1 लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल.
तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील १० अशा एकूण ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम राबविण्यात येईल व ३६० संकल्पनांच्या राज्यस्तरीय सादरीकरणातून उत्तम १० विजेत्यांना ५ लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल.
या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त माळी यांनी केले आहे.