no images were found
फॅटी लिव्हरची लक्षणे: पचनक्रियेतील ही चार लक्षणे सांगू शकतात की तुम्ही गंभीर फॅटी लिव्हरने त्रस्त आहात
फॅटी लिव्हर या आजाराला स्टियोटोसिस असेही म्हटले जाते.हा आजार तेंव्हा होतो जेंव्हा तुमच्या यकृता मध्ये अधिक प्रमाणात चरबीचे प्रमाण साठू लागते. काही प्रमाणात चरबी असणे साधारण असते पण चरबीचा अतिरेक हा घातक असतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरात आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ लागतात. अगदी थोड्या प्रमाणात असल्यास त्याचा त्रास होत नाही पण ज्यावेळी हे प्रमाण यकृताच्या वजनाच्या १० टक्के होते त्यावेळेस हे चिंतेचे कारण असते. पचनसंस्थेत यकृत महत्त्वपूर्ण भुमिका बजावत असल्यामुळे यात कोणतेच आश्चर्य नाही की फॅटी लिव्हर आजाराचे गंभीर स्वरुप हे आधीच दिसून येत असते. पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल च्या सल्लागार – वैद्यकीयगॅस्ट्रोएन्टेरोलॉजी,डॉअमोलडहाळे, यांनी फॅटी लिव्हर चा आजार आहे हे दर्शवणारी पाचनसंस्थेतील खालील लक्षणे नमूद केली आहेत. –
१) सातत्याने पोटातदुखणे- गंभीर स्वरुपातील फॅटी लिव्हर आजाराशी संबंधित प्रमुख लक्षण म्हणजे सातत्याने पोटात दुखणे. यकृतामध्ये अधिक प्रमाणात चरबी जमा होऊ लागते तसतशी यकृताला सूज येऊन ते वाढू लागते, ज्यामुळे जवळपासचे अवयव आणि पोटावर ताण पडू लागतो. यामुळे पोटात दुखू लागते आणि पोटाच्या उजव्या बाजूला जड वाटू लागते. जर हे दुखणे अधिक काळ वाढू लागले किंवा दुखणे अधिक होऊ लागले तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेऊन फॅटी लिव्हर आजार आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते.
२) मळमळणे आणि उलट्या होणे :शरीरातील विषारी पदार्थांवर प्रक्रिया करुन ते बाहेर टाकून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी यकृत हा अवयव महत्त्वपूर्ण भुमिका बजावतो, अगदी पाचन संस्थेतून शोषलेल्या पदार्थांमधूनही यकृत शरीराला डिटॉक्सिफाय करत असते. परिणामी यकृतावर चरबीमुळे अतिरिक्त ताण येऊ लागतो त्यावेळी यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो, ज्यामुळे शरीरात विषारी घटक साठायला लागतात. या विषारी घटकांमुळे मळमळणे आणि उलट्या होऊ लागतात कारण शरीर या घातक पदार्थांना बाहेर टाकण्याचा प्रयत्न करु लागते. सातत्याने उलट्या किंवा मळमळ या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये कारण हे अतिशय गंभीर अशा फॅटी लिव्हर इलनेस चे लक्षण असू शकते.
३) भूक न लागणे: अतिशय गंभीर स्वरुपाच्या फॅटी लिव्हर मुळे शरीरातील पचन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात, यामुळे भूक लागणे कमी होऊ लागते. यकृत हे अन्न पचन घडवण्यासाठी आणि फॅट्स पचवण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेले पित्त तयार करत असते. ज्यावेळी यकृतावर अधिक प्रमाणात चरबी जमा झाल्यास चरबी पचवण्याची क्षमता कमी होऊ लागते, त्यामुळे पोट भरलेले वाटणे, त्रास होणे आणि खाण्याची इच्छा नसणे अशा गोष्टी घडू लागतात. जर भूक लागणे अगदीच कमी झाले आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या.
४) कावीळ: फॅटी लिव्हर डिसीजच्या काही गंभीर केसेस मध्ये कधीकधी कावीळ ही होऊ शकते. कावीळ तेंव्हा होते ज्यावेळी रक्तातील लाल पेशींचे विभाजन होत असते त्यावेळी पिवळ्या रंगाचे पिगमेंट ज्याला बिलीरुबीन म्हणतात ते यकृत बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे शरीरात जे अतिरिक्त बिलीरुबीन असते ते रक्तात मिसळायला सुरुवात होते, त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होऊ लागतात. कावीळ हे एक अतिशय गंभीर लक्षण असून यकृताच्या कार्यात अडथळा आल्याचे ते एक मोठे द्योतक आहे. म्हणूनच अशा केसेस मध्ये ताबडतोप वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असते.
म्हणूनच जितक्या लवकर फॅटी लिव्हर डिसीजचे निदान होईल तितक्या लवकर त्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते कारण ते न केल्यास यकृताला अधिक इजा होऊन अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. या लक्षणांमुळे किंवा अचानकपणे पचनाशी संबंधित समस्या उद्भवल्यास तत्काळ तज्ञांचा सल्ला घेऊन तुमची तपासणी लवकरात लवकर करुन घ्या.