no images were found
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला इटलीचा प्रतिष्ठित ए’ डिझाईन पुरस्कार
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेला इटलीतील प्रतिष्ठित ए’ डिझाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाला बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय डिझाइन श्रेणीसाठी हा सन्मान मिळाला आहे. नाविन्यपूर्ण, सर्वांगीण आणि टिकाऊ डिझाइनसाठीच्या वचनबद्धतेचा हा गौरव असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
‘ए’ डिझाईन अवॉर्ड हा डिझाईन आणि इनोव्हेशनमधील उत्कृष्टतेचा दीपस्तंभ आहे. जागतिक स्तरावर डिझाईन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. डिझाईन आणि इनोव्हेशन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील 40 ज्युरी सदस्यांच्या पॅनेलने विद्यापीठाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या सन्मानामुळे प्रकल्पाच्या सार्वत्रिकता आणि भविष्य-केंद्रित दृष्टीकोनावर शिक्कामोर्तब झाले आहे. डी वाय
पाटील ग्रुपचे आर्किटेक्ट केतन जावडेकर यांनी इटलीमध्ये हा पुरस्कार स्वीकारला.
विद्यापीठ परिसराच्या अत्याधुनिक मास्टर प्लॅनिंगच्या माध्यमातून अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन सुविधा, नवोपक्रमाना चालना देणारे प्रगत तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील प्रयोग, त्याचबरोबर शैक्षणिक, मनोरंजनात्मक, निवासी आणि वैद्यकीय सुविधा आदीच्या माध्यमातून सर्वसमावेशक सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत.
पुढील दहा वर्षांसाठी विद्यापीठाच्या भविष्य-केंद्रित शैक्षणिक मास्टर प्लॅनला या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले आहे. कृषी आणि तंत्रज्ञानातील आंतरविद्याशाखीय अभ्यासाला प्राधान्य, विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे आणि भावी नेतृत्व तयार करण्याचा उद्देश विद्यापीठाने ठेवला आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम, संशोधन केंद्रित उपक्रम, उद्योग जगताशी सहयोग आणि वाढीव आंतरराष्ट्रीय विनिमय कार्यक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
“हा पुरस्कार भारतातील अग्रगण्य कृषी आणि तांत्रिक शिक्षणासाठी आमची वचनबद्धता अधोरेखित करतो. तळसंदे कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट शिक्षणासाठी जागतिक मानक तयार करण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे अधिकच बळ मिळाले आहे,” असे डॉ संजय डी. पाटील यांनी सांगितले.
यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, आर्किटेक्ट केतन जावडेकर आदी उपस्थित होते.
कोल्हापूर: डिझाईन ए’ पुरस्कारासोबत डॉ संजय डी पाटील, केतन जावडेकर, पृथ्वीराज पाटील, डॉ ए के गुप्ता.