
no images were found
नागरी सहकारी बँकांचे समाजातील स्थान महत्त्वाचे: डॉ. श्रीकृष्ण महाजन
कोल्हापूर : नागरी सहकारी बँकांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आहे व त्यांनी स्पर्धात्मक युगात कायम अग्रेसर राहण्यासाठी आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ श्रीकृष्ण महाजन यांनी केले. शिवाजी विद्यापीठामध्ये काल दोन दिवसीय मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाच्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र व कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरी सहकारी बँकांच्या शाखाधिकाऱ्यांसाठी ” कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रॅम फॉर मॅनेजर्स ऑफ अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंक्स ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट” या दोन दिवसीय मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमला काल सुरुवात झाली. नागरी सहकारी बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःच्या बँकांना सक्षमतेने पुढे नेण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढीसाठी शिवाजी विद्यापीठाने या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.
यावेळी डॉ. महाजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा उहापोह करताना नागरी सहकारी बँकांचे या अर्थव्यवस्थेतील स्थान व त्यांची गरज याची व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून मांडणी केली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये कुंभी कासारी सहकारी बँकेचे सीईओ श्रीयुत दत्तात्रय राऊत यांनी नेतृत्व गुण व आरबीआय च्या विविध मापदंडां संदर्भात उत्कृष्ट मांडणी करून उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया चेअरचे प्रोफेसर डॉ.राजन पडवळ यांनी आधुनिक व्यवस्थापकीय दृष्टिकोन व त्याची गरज ही विविध उदाहरणे देऊन उपस्थितांसमोर मांडली. नागरी सहकारी बँकांना पब्लिक व प्रायव्हेट सेक्टर बँकांबरोबरच परदेशी बँकांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागते व त्यात तग धरून यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक व आधुनिक व्यवस्थापकीय दृष्टिकोन यांचे महत्त्व डॉ राजन पडवळ यांनी विशद केले.
तिसऱ्या सत्रामध्ये आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ श्री प्रशांत गंभीर यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांची ओळख वेगवेगळी उदाहरणे देऊन उपस्थितांना करून दिली.
आज, उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी श्री पंचगंगा सहकारी बँकेचे सीईओ दीपक फडणीस, सायबरच्या कौन्सिलर उर्मिला चव्हाण व अपना सहकारी बँकेच्या अधिकारी राणी काशीकर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.