no images were found
स्वातंत्र्य, समता व बंधुभाव याचा पाया न्याय असला पाहिजे प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांचे प्रतिपादन
कोल्हापूर: समता, स्वातंत्र्य व बंधुभाव माणसाला कसा प्राप्त होऊ शकेल यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा म्हणजे संविधान महत्त्वाचे मानले. कायदा जर हे माणसाला देत नसेल तर अशा कायद्याच्या विरोधात लोकांनी लढले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. हरीष भालेराव यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या व प्राचार्य डॉ. दिनकर खाबडे लिखित ‘दि सोशल रिफॉर्म मुव्हमेंट अँड डॉ. आंबेडकर्स इंटलेक्चुअल जस्टिफिकेशन फॉर ह्यूमन इक्वालिटी अँड जस्टीस’ (‘सामाजिक सुधारणा चळवळ आणि मानवी समानता आणि न्यायासाठी डॉ. आंबेडकरांचे बौद्धिक समर्थन’) या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
पुढे बोलताना भालेराव म्हणाले, सामाजिक सुधारणांच्या चळवळीबाबत डॉ. आंबेडकरांनी मानवी समता व न्याय यांचे बौद्धिक समर्थन केले आहे. पाश्चिमात्य लोकशाही विचारापासून विविध संदर्भ देत भारतातील लोकशाहीपर्यंत येणाऱ्या समतामूलक समाजासाठी ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यादृष्टीने हे पुस्तक विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तसेच हे पुस्तक संशोधनाचे विषय स्पष्ट करीत आहे. गुन्हेगाराला कायद्याने शिक्षा मिळू शकेल परंतु; एखादा सामाजिक गटच अन्याय करू लागला व एखाद्या विशिष्ट समाजाचे अधिकार नाकारू लागला तर अशा प्रसंगी सामाजिक गटाला शिक्षा कशा प्रकारे शिक्षा करता येईल हा डॉ. आंबेडकरांच्या समोर महत्त्वाचा प्रश्न होता. अशा प्रसंगी समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव याचा न्याय हा पाया असला पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू शिर्के म्हणाले की, डॉ. खाबडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांबाबत केलेले विश्लेषण त्याबाबतच्या संशोधनास योग्य दिशा देणारे आहे. डॉ. आंबेडकरांचे ग्रंथप्रेम हे त्यांना बौद्धिक समर्थनाकडे घेऊन गेले. मुद्दे मांडताना पूर्ण संदर्भासह मांडणी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य दिसून येते. या प्रसंगी पुस्तकाचे लेखक प्राचार्य दिनकर खाबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धिक विचारांवर पाश्चात्य विचारवंतांचा मोठा प्रभाव होता. सदर
पुस्तकामध्ये त्यांनी ज्यांना आदर्श मानले अशा विचारवंतांचा आढावा घेतला आहे. बाबासाहेबांना पाश्चात्य विचारवंतांचे आकर्षण वाटत होते कारण त्या विचारवंतांच्या लिखाणात असलेला समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचा विचार हे होते. पाश्चात्य विचार परंपरेमध्ये ज्याप्रमाणे गुरु-शिष्य परंपरा आढळते त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरु-शिष्य परंपरेचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. तर कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश भाले यांनी केले. या कार्यक्रमास दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे, डॉ. किशोर खिलारे उपस्थित होते.