
no images were found
अदानी ग्रुप ईशान्य भारतात करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक
नवी दिल्ली, :– भारताच्या ईशान्य भागाच्या आर्थिक विकासाच्या संधींना मोठ्या प्रमाणात चालना देत, अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारतासाठी येत्या दहा वर्षांत 1 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
नवी दिल्लीत झालेल्या ‘रायझिंग नॉर्थईस्ट ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, ईशान्य भारतातील राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि अनेक वरिष्ठ नेते व उद्योगपती यांच्या उपस्थितीत गौतम अदानी बोलत होते. त्यांनी सांगितले की, ही गुंतवणूक हरित ऊर्जा(ग्रीन एनर्जी), वीज वाहतूक (पॉवर ट्रान्समिशन), रस्ते, डिजिटल पायाभूत सुविधा, दळणवळण(लॉजिस्टिक्स) आणि स्किलिंग अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर यांवर केंद्रित असेल. “आपला भर स्मार्ट मीटर्स, जलविद्युत(हायड्रो), पंप स्टोरेज प्रकल्प, वीज वाहतूक, रस्ते व महामार्ग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स आणि स्किलिंग अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून क्षमता वाढविण्यावर असेल,” असे अदानी यांनी स्पष्ट केले.
फेब्रुवारी महिन्यात ‘अॅडव्हान्टेज आसाम 2.0’ समिटमध्ये जाहीर केलेल्या 50,000 कोटींच्या गुंतवणुकीला दुप्पट करत, त्यांनी आज आणखी 50,000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना उद्देशून ते म्हणाले, “आपल्या नेतृत्वामुळे शालिनता कळाली आणि आम्ही प्रेरित झालो आहोत. म्हणूनच मी आज जाहीर करतो की अदानी ग्रुप येत्या 10 वर्षांत ईशान्य भारतात आणखी 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे.”
श्री. अदानी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारतात झालेल्या परिवर्तनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की 2014 पासून 6.2 लाख कोटींची पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक झाली आहे, रस्त्यांचे जाळे दुप्पट होऊन 16,000 किलोमीटरपर्यंत वाढले आहे आणि कार्यरत विमानतळांची संख्या 9 वरून 18 झाली आहे.
“ऍक्ट ईस्ट, ऍक्ट फ़ास्ट, ऍक्ट फर्स्ट” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला गौतम अदानी यांनी ईशान्य भारताच्या विकासासाठी निर्णायक टप्पा ठरल्याचे म्हटले. “हे फक्त एक धोरण नाही, हे आपल्या दूरदृष्टीचे आणि मोठ्या वैचारिक दृष्टीचे उदाहरण आहे,” असे त्यांनी सांगितले.
लोककेंद्रित दृष्टिकोन अधोरेखित करत श्री. अदानी म्हणाले की, केवळ भौतिक पायाभूत सुविधांच्या पलीकडे जात अदानी ग्रुपची गुंतवणूक रोजगार निर्मिती, स्थानिक उद्योजकता आणि समुदाय सहभाग यांना प्राधान्य देईल. “पायाभूत सुविधांपेक्षा अधिक आम्ही माणसांमध्ये गुंतवणूक करू. प्रत्येक उपक्रमात स्थानिक रोजगार, स्थानिक उद्योजकता आणि समुदाय सहभाग याला सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे त्यांनी सांगितले.
अदानी ग्रुप ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत असल्याचे पुनः स्पष्ट करत, श्री. अदानी यांनी आपल्या भाषणाचा शेवट एका भागीदारीच्या भावनिक संदेशाने केला. ते म्हणाले,“ईशान्य भारतातील माझ्या बंधू-भगिनींनो, अदानी ग्रुप तुमच्या स्वप्नांमध्ये, तुमच्या अस्मितेमध्ये आणि तुमच्या भवितव्यात नेहमी तुमच्यासोबत उभा राहील.”
या घोषणेमुळे अदानी ग्रुप हा ईशान्य भारताच्या आर्थिक परिवर्तनामध्ये महत्त्वाचा खासगी भागीदार ठरणार असून ऊर्जा, संपर्क व्यवस्था(कनेक्टिव्हिटी) आणि येथील लोकांच्या उपजीविकेच्या संधींमध्ये दीर्घकालीन परिणामकारक बदल घडून येतील.