no images were found
जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान पिता-पुत्राचा मृत्यू
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आयुर्वेदिक उपचार करत असताना योग्य पथ्य पाळले नाही तर काय होतं याची प्रचिती आली.
सर्दी, खोकला होता म्हणून रात्री जेवणानंतर सर्वांनी घरगुती आयुर्वेदिक काढा प्यायला. त्यानंतर मध्यरात्री वडील, मुलगा आणि मुलीची प्रकृती बिघडली. यानंतर उपचारादरम्यान पिता पुत्राचा मृत्यू झाला. हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे.
आयुर्वेदिक औषध कधी घ्यावे आणि कोणत्या पदार्थांवर घेऊ नये याचे ज्ञान नसल्याने कधी कधी आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. कधी कधी जीवावरही बेतते.
पोतेकर कुटुंबीयांनी काल रविवार असल्याने दुपारी मटण खाल्ले होते. त्यानंतर रात्री पुरणपोळ्या खाल्ल्या. मग जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला आणि रात्री झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव, मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पहाटेच्या सुमारास हनुमंतराव पोतेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी मुलगा अमित पोतेकर याची प्राणज्योत मालवली. तर उपचारानंतर मुलीची प्रकृती स्थिर आहे.
नॉनव्हेज, पुरणपोळी आणि आयुर्वेदिक काढा यामुळे विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.