
no images were found
सहस्ररावणाची व्यक्तिरेखा आणि त्याचे अंतःस्थ हेतू समजून घेणे आव्हानात्मक
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांचे दिव्य चरित्र पडद्यावर जिवंत केले आहे. सध्या या मालिकेत राम आणि सीता एकमेकांपासून दूर राहात आहेत. सीता एका जंगलात, एका आश्रमात राहात आहे आणि तिने लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) या दोन पुत्रांना जन्म दिला आहे. सीता आणि श्रीराम हे आपले माता-पिता आहेत याबाबतीत लव आणि कुश अनभिज्ञ आहेत. पण, श्रीरामाच्या पराक्रमाच्या कथा ऐकत-ऐकत ते मोठे झाले आहेत. दरम्यान, सहस्र रावण (प्रणीत भट्ट) आपला अधिकार गाजवून रामाच्या नैतिक सार्वभौमत्वाला आव्हान देतो.
त्याने केलेल्या पौराणिक भूमिकांमुळे प्रणीत भट्ट खूप लोकप्रिय झाला आहे. आता पुन्हा तो एका पौराणिक आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत तो सहस्र रावण ही दुष्ट आणि धूर्त व्यक्तिरेखा साकार करून त्या खलनायकाला एक नवीन परिमाण देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रणित भट्टने त्याची भूमिका आणि या दिव्य कहाणीत त्याची व्यक्तिरेखा कशी ठळकपणे उठून दिसते याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या:
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत मी सहस्र रावणाची भूमिका करत आहे. तो दशानन रावणाचा मोठा भाऊ असून त्याला एक सहस्र डोकी आहेत. असुरांच्या ताकदीची पराकाष्ठा त्याच्यात दिसते आणि आपल्या हजार डोक्यांचा उपयोग तो लोकांची दिशाभूल करून त्यांना गोंधळात टाकण्यासाठी करतो. फसवेपणा आणि कुटिलपणा हे त्याचे स्वभावविशेष आहेत.
अनेक लोकांना सहस्र रावण माहीत नाहीये त्यामुळे, मी त्याचे पात्र वेगळ्या दृष्टिकोनातून उभे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या पात्रात खोली आणि जटिलता आणली आहे. त्याची भूमिका करण्यासाठी मी सहस्र रावणाचा अभ्यास केवळ एक खलनायक म्हणून केला नाही, तर अपार ज्ञान, ताकद आणि आकांक्षा यांनी प्रेरित व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिले. ही व्यक्तिरेखा केवळ शारीरिक सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करत नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातून त्याची बुद्धिमत्ता, विशालपणा आणि त्याचा दुर्दैवी अस्त असे वेगवेगळे पदर उलगडतात.
खरं सांगायचं तर या मालिकेच्या लेखकांनी या व्यक्तिरेखेचे चित्रण माझ्यासमोर केले, त्या अगोदर मला सहस्त्र रावणाविषयी माहीत नव्हते.त्याच्यातील गुणावगुण मला फार आकर्षक वाटले. या व्यक्तिरेखेची नस पकडणे आणि त्याचे खरे हेतू ओळखणे हे एक आव्हान होते. त्यामुळे मी आमच्या क्रिएटिव्ह टीमला सपशेल शरण गेलो आणि त्यांचे व्हिजन आणि दिग्दर्शन यांचे अनुसरण केले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे ही व्यक्तिरेखा जिवंत करणे हे आव्हान न राहता ती एक संधी बनली!
सहस्र रावण चांगले आणि वाईट यांच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावतो. तो दशाननापेक्षाही अधिक मायावी आहे. शांती आणि नीतीमत्ता प्रस्थापित करणाऱ्या राम राज्याची ताकद त्याने जोखली आहे.गोंधळ निर्माण करून सत्याचे बंध तोडण्याचे त्याचे काम आहे, पण त्याला हे समजू शकत नाही की, राम, हनुमान, लक्ष्मण आणि सीता यांच्या आधाराने उभे राहिलेले रामराज्य तत्वाधिष्ठित आहे आणि ते कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. शेवटी, सत्य आणि धर्म यांचा असत्यावर नेहमीच विजय होतो.
पौराणिक व्यक्तिरेखांची सखोलता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुंतागुंत पाहून मी नेहमी अचंबित होतो. या भूमिका करण्यासाठी नटाला त्यांच्यातील चांगल्या-वाईटाचीगुंतागुंत समजून घेणे आवश्यक असते आणि पडद्यावर त्या कशा साकारायच्या याचाही विचार करावा लागतो. अशा मालिकांमध्ये काम करून मी समाधान अनुभवतो. आणि मला वाटते की पौराणिक मालिका करणे म्हणजे इतिहासातील एखादे पृष्ठ पुन्हा जिवंत करणे. हा अनुभव समृद्ध करणारा आणि परिपूर्तीचा आनंद देणारा असतो.
सोनी सब वाहिनीवरील ‘श्रीमद् रामायण’ मध्ये काम करण्याचा अनुभव अद्भुत आहे. ही संपूर्ण टीम म्हणजे जणू एक कुटुंबच आहे. त्या सगळ्यांनी मिळून एक प्रसन्न आणि सहकाराचे वातावरण उभे केले आहे, जेथे आम्ही सगळे एकत्र मिळून शिकतो आणि मोठे होतो. रामायणासारख्या भव्य दिव्य मालिकेत काम करणे आणि ते देखील इतक्या उत्साही टीम सोबत, हा समाधान देणारा अनुभव आहे. सोनी सब आणि स्वस्तिक प्रॉडक्शन्स यांच्यासोबत या प्रवासात सहभागी होताना धन्यता वाटत आहे.