
no images were found
नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांनी पुढे यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर : नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी साक्षरता वर्ग लवकरात लवकर सुरु करावेत, अशा सूचना देवून यासाठी स्वयंसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातंर्गत सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीकरिता 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्याकरिता नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय नियामक परिषदेचे अध्यक्ष राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हास्तरीय नियामक मंडळाच्या सभेस शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी केतन शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वि.तु.पाटील, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, शासकीय विद्यानिकेतनचे बाजीराव पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्र. उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक तसेच अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, या अभियानात सहभागी होण्यासाठी तसेच सहाय्य करण्यासाठी विनावेतन, विनामानधन तत्त्वावर सेवाभावी वृत्तीने स्वयंसेवक काम करु शकतात. या अभियानात जिल्ह्याचे काम उत्कृष्ट होण्यासाठी स्वयंसेवकांनी सहकार्य करावे. तसेच मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांतील शिक्षकांना हे काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व्हेक्षण करण्यासाठी व स्वयंसेवक म्हणून कामकाज करण्यासाठी सर्व शिक्षक, पंचायत राज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच नेहरु युवा केंद्र, एन.एस.एस., एन.सी.सी. व स्काऊट गाईडमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर स्वयंसेवी संस्था यांचा देखील सहभाग घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये सर्व्हेक्षण करणे व स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी ‘शाळा’ हे एकक आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी इच्छुक स्वयंसेवकांनी संबंधित परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना), कोल्हापूर कार्यालयाच्या ई मेल eoschemekop@gmail.com वर संपर्क साधावा. तालुका स्तरावर निरक्षर संख्या उद्दिष्ट देण्यात आले असून गटशिक्षणाधिकारी यांनी गावनिहाय निरक्षर संख्या निश्चित करुन कामकाज सुरु करावे, असे शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी सांगितले.