
no images were found
आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
सातारा :- आम्हाला काँग्रेस पक्षाशी वाद करायचा नाही. आम्ही बसून निर्णय घेऊ. आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, यासाठी काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेता आणि प्रतोद पदाचे पत्र घेऊन ते राहुल नार्वेकरांकडे सोपविले.यानंतर आता अजित पवार यांच्या गटानेही प्रतोद निवडला आहे. या घडामोडींमध्ये काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो,असे सूतोवाच केले आहे.
आमची याचिका त्यांना मिळाली असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. ते त्यावर विचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आमचे म्हणणे मांडू द्यावे अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
ज्या ९ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भाजपाबरोबर शपथ घेण्याचे काम केले त्याच क्षणी ते ९ जण अपात्र ठरतात असल्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्षांच्याकडे दिला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं.
आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही. त्यांना परत येण्याकरता आम्ही पूर्ण संधी देऊ. परंतु, जे येणार नाहीत. जे पार्टीची लाईन सोडून जातात त्यांच्यावर आवश्यक कारवाई आम्ही करू. सगळेच आमदार नाहीत, परंतु, बहुतेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.