no images were found
आम्रपाली गुप्ता म्हणाली, “लॉकडाऊननंतर मी अभिनयासाठी ‘मीत’द्वारा पुनरागमन
‘झी टीव्ही’वरील ‘मीत’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. जबाबदारीची कामे देण्यात समाजात होत असलेल्या लिंगभेदाला आव्हान देणार््या मीत (आशी सिंग) या तरुणीची कथा या मालिकेत सादर करण्यात आली असून स्त्री घेऊ शकत नाही, अशी कोणतीही जबाबदारी जगात नाही, हेच त्यातून दाखवून देण्यात आले आहे. मालिकेच्या कथानकाचा काळ अलिकडेच 16 वर्षांनी पुढे नेण्यात आला असून त्यानंतर आशी सिंह ही सुमित म्हणून तर सय्यद रझा अहमद हा श्लोक म्हणून प्रमुख भूमिका साकारीत आहेत.
मीतची मुलगी सुमित ही रोमॅन्टिक स्वभावाची असली, तरी ती अतिआत्मविश्वासू असते आणि तिच्या जीवनात कसलेही ध्येय नसते. ती इतरांची काळजी घेत असली, तरी तिने अजूनपर्यंत कोणत्याही कठीण परिस्थितीचा मुकाबला केलेला नसतो. दुसरीकडे, श्लोक हा कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजातील असून त्याने आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या संगीताच्या छंदाला मुरड घातलेली असते. त्याच्या दृष्टीने आपल्या कुटुंबाचे सुख सर्वप्रथम असते. तो स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी असला, तरी स्वभावाने मिश्कील असतो. मीतइतकी सुमित ही स्वतंत्र नसते, कारण तिचा जन्मच मुळी तोंडात चांदीचा चमचा घेऊन झालेला असतो. तिचे कुटुंबीय श्रीमंत असतात. पण लग्नानंतर ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहायला आल्यामुळे तिच्यापुढे अडचणी उभ्या राहतात. तिला जीवनासाठी करावा लागणार््या संघर्षाची पहिल्यापासून जाणीव होऊ लागते.
या नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच प्रेक्षकांनी लोकप्रिय अभिनेत्री आम्रपाली गुप्ता हिला शगुनच्या भूमिकेत पाहात आहेत. आम्रपाली अनेक वर्षांपासून मनमीतवर (शगुन पांडे) जिवापाड प्रेम करीत असते, पण मनमीतने तिच्याऐवजी मीतशी विवाह केल्याने तिला मीत हूडावर सूड उगवायचा असतो. ‘तुझसे है राबता’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्यानंतर तब्बल चार वर्षांनी आम्रपाली ‘झी टीव्ही’ वाहिनीवर परतत आहे. इतकेच नव्हे, तर लॉकडाऊननंतर या मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे आम्रपाली खूपच खुशीत आहे.
आम्रपाली गुप्ता म्हणाली, “गेली अनेक वर्षं टीव्हीवर अतिशय लोकप्रिय राहिलेल्या एका मालिकेमधून मला टीव्हीवर पुनरागमन करण्याची संधी मिळत असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. दुसर््या कोणाच्या भूमिकेत प्रवेश करणं ही सोपी गोष्ट नाही. पण या उद्योगात अशा गोष्टी घडतच असतात. खरं तर लॉकडाऊननंतर मी मीतमधील भूमिकेद्वारे पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करीत आहे. त्याबद्दल मी खूप उत्सुक बनले आहे. नकारात्मक भूमिका साकारणं ही गोष्ट मला नवी नाही आणि मी पूर्वीही अशा भूमिका रंगविल्या आहेत. पण प्रत्येक भूमिकेची स्वत:ची अशी आव्हानं असतात, त्यामुळे मला माझ्या अभिनयकौशल्यात सुधारणा करण्याची संधी मिळते.”
आम्रपाली पुढे म्हणाली, “मला ही भूमिका देऊ करण्यात आल्यावर मी त्यावर काही विचार केला नाही आणि ती ऑफर लगेच स्वीकारली. आता या मालिकेतील भूमिकेद्वारे मला माझ्या अभिनयगुणांचा विकास करण्याची संधी मिळणार असल्याने मी खूप थरारून गेले आहे. मी सेटवरील प्रत्येकाशी आधीच छान संबंध राखले आहेत. या भूमिकेद्वारे मला पडद्यावर एक सशक्त भूमिका रंगविण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदात असून ही व्यक्तिरेखा विकसित करण्यास अधीर झाले आहे.”