no images were found
सुमीर पसरिचाचे चार वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन
प्यार का पहला नाम राधा मोहन, तेरी मेरी इक जिंदरी आणि रब से है दुआ यासारख्या देशभरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंत केलेल्या मालिकांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ या संस्थेच्या सहकार्याने ‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. मालिकेत शिव आणि शक्तीच्या भूमिका लोकप्रिय कलाकार अनुक्रमे अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा साकारणार असून मालिकेच्या प्रसिध्दीसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या प्रोमोला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. मालिकेचे कथानक, त्यातील कलाटण्या आणि व्यक्तिरेखा यांच्याबद्दल सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली असून प्रेक्षकांमध्ये मालिका पाहण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे.
‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’च्या कलाकारांमध्ये आता लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर सुमीर पसरिचा याचाही समावेश झाल्यामुळे या उत्कंठेत भरच पडणार आहे. मालिकेत तो पूर्णेन्दू या भविष्यवेत्त्याची भूमिका साकारणार असून त्याला भावी घटनांची झलक आधीच दिसत असे. मालिकेच्या कथानकाला अनेक नव्या कलाटण्या देण्यात त्याची व्यक्तिरेखा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे सुमीर ही भूमिका साकारण्यास खूप उत्सुक झाला आहे. तब्बल चार वर्षांनंतर तो टीव्हीवर परतत असल्यामुळेही त्याला ही भूमिका साकारण्याची उत्सुकता आहे. या मालिकेतील त्याचा अवतार अगदी भिन्न आणि नवा असल्यामुळे एरवी त्याला पम्मी ऑन्टीच्या रूपात पाहणार््या प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसेल.
सुमीर पसरिचा म्हणाला, “प्यार का पहला अध्याय शिव शक्ती मालिकेत भूमिका रंगविण्यास मी खूप अधीर झालो आहे. मालिकेचं कथानक अगदी वेगळं असल्यामुळे नव्हे, तर झी टीव्ही वाहिनीवरील ही माझी पहिली मालिका असल्यामुळेही मला खूप उत्सुकता वाटत आहे. यापूर्वी मी या वाहिनीवर एकदा यजमानाचं काम केलेलं असलं, तरी यावेळी मी प्रथमच एका रीतसर नव्या मालिकेत भूमिका साकारणार आहे. म्हणूनही माझ्या मनात त्याबद्दल खूप उत्सुकता आहे. मालिकेतील माझी भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. या भूमिकेतील माझं रूप पाहूनही प्रेक्षकांना खूप धक्का बसेल कारण त्यांनी मला आजवर फक्त पम्मी ऑन्टीसारख्या भूमिकेत पाहिलं आहे. मी अशी भूमिका यापूर्वी कधी साकारलेली नाही. गेली काही वर्षं मला मी एका चाकोरीत अडकल्यासारखं वाटत होतं. पण आता ही भूमिका मला एका पूर्णपणे नव्या अवतारात सादर करणार असल्याने माझी पम्मी ऑन्टीची प्रतिमा मोडण्याचं काम ही भूमिका करील.”
तो पुढे म्हणाला, “अलिकडेच आम्ही वाराणशीत चित्रीकरण केलं आणि ते करताना मी खूप मजा केली. मालिकेतील कलाकारांबरोबर माझी ओळख तर झालीच, पण त्यांच्याबरोबर मी काही एकत्र प्रसंगही चित्रीत केले. तसंच आम्ही त्या शहरातही फेरफटका मारला. आता मी यापूर्वी कधीही न साकारलेल्या या व्यक्तिरेखेद्वारे मी प्रेक्षकांवर माझा ठसा उमटवू शकेन, इतकीच माझी इच्छा आहे. तसंच प्रेक्षक आमच्यावर आणि या मालिकेवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतील, अशी मी अपेक्षा बाळगतो.”