no images were found
लोकप्रिय अभिनेता अलीहसन तुराबी चंद्रावतच्या भूमिकेत दिसणार
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका माळवा प्रांताची महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायक जीवनाचा पट उलगडून दाखवते. शिक्षणाचा पुरस्कार असो, विधवा पुनर्विवाह असो, महिला सशक्तीकरण असो किंवा आपल्या पतीच्या निधनानंतर राज्य सांभाळण्याची प्रचंड मोठी जबाबदारी असो, अहिल्याबाईंनी प्रत्येक वेळी चांगल्या मूल्यांची जोपासना केली आणि आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध करून दाखवले की, माणूस जन्माने नाही, तर कर्माने मोठा होतो.
गेल्या दोन दशकांपासून टेलिव्हिजनवर विविध प्रकारच्या भूमिका करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता अलीहसन तुराबी आता पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो कुटिल वृत्तीच्या चंद्रावतची भूमिका करणार आहे. अहिल्याबाईंकडून माळवा प्रांत हिसकावून घेण्याचा त्याचा मानस आहे. आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना अलीहसन म्हणतो, “पुण्यश्लोक अहिल्याबाई ही भारतीय टेलिव्हिजनवरील एक आगळीवेगळी मालिका आहे. अहिल्याबाईंच्या जीवनातील चढ-उतारांचे त्यात तपशीलवार वर्णन केले आहे. मी इंदूरचा असल्यामुळे होळकर घराण्याच्या गोष्टींचे मला पहिल्यापासून आकर्षण आहे. मला जेव्हा चंद्रावत ही भूमिका देण्यात आली, तेव्हा मी जराही आढेवेढे न घेता ती स्वीकारली. कारण मनात मी कधी तरी हे स्वप्न बघितले होते, जे आता साकार होत होते. चंद्रावतची भूमिका करताना अहिल्याबाई होळकर ह्या कर्तृत्ववान स्त्रीकडून माळवा प्रांत जिंकून घेण्यासाठी कारवाया करणाऱ्या या नकारात्मक व्यक्तिरेखेतील गुंतागुंत दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावत आणि आपल्या सैन्यापेक्षा शक्तीशाली असलेल्या त्याच्या सैन्याचा सामना अहिल्याबाई कशा पद्धतीने करतात, हे बघणे रोमांचकारी असेल. मालिकेच्या या अध्यायात लोभ आणि निर्धार यांच्यातील लढा बघायला मिळेल. या भूमिकेला माझा सर्जनशील स्पर्श देण्यासाठी मी उत्सुक आहे आणि मला आशा आहे की, अहिल्याबाईंच्या भयंकर शत्रूच्या या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकेन.”
या भव्य मालिकेतील इतर कलाकारांसोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना अली हसन म्हणाला, “पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेच्या समस्त टीमने खूप अगत्याने आणि आपुलकीने माझे स्वागत केले. या उत्तम कालाकारांसोबत काम करायला मला खूप मजा आली. मालिकेतील हा प्रवास करण्यास मी उत्सुक आहे आणि मला आशा आहे की, प्रेक्षक पूर्वीप्रमाणेच यापुढेही माझ्यावर आणि या मालिकेवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतील.”
कथानकात पुढे जाता प्रेक्षक बघतील की, अहिल्याबाई मालेरावला कोणाकोणाचा पाठिंबा आहे, याचा आढावा घेतील आणि पुढे होणाऱ्या तुंबळ युद्धात चंद्रावतचा सामना करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देतील. चंद्रावत आणि त्याच्या तीन लाखापेक्षा जास्त सैन्याच्या रूपाने चालून येत असलेल्या आक्रमणापासून अहिल्याबाई माळवाचे रक्षण करू शकतील का?