
no images were found
पोलिसांच्या भीतीने तरुणाची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी ;एकाचा मृत्यू
कोल्हापूर: कोल्हापुरात राजेंद्र नगर परिसरात पोलिसांनी एका इमारतीत जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.
साहिल मायकेल मिणेकर असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. याठिकाणी नागरिक आणि नातेवाईकांनी गर्दी केल्यानं परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगरमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलीस आल्याचे कळताच जुगार खेळणाऱ्यांनी पैसे आणि साहित्य तिथेच टाकले. यातील काही तरुणांनी पोलीस कारवाई करतील या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून उड्या टाकल्या.यामध्ये 26 वर्षीय साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर दत्तात्रय देवकुळे हा तरुण गंभीर जखमी झाला.इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
साहिलचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याच्या मित्र आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी फौजफाटा तैनात केला. साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आलीय.