
no images were found
बंदुकीचा धाक दाखवून पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल बळकावले
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल हे बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा आरोप मालकाच्या मुलीने केला आहे. तसंच, लग्नाआधी त्यानं बलात्कार केल्याचा आरोपही फिर्यादी महिलनं केला आहे.पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात महिलेनं पोलिसांत तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८), अभिजित विनायकराव जाधव (वय ४०), विनायकराव जाधव (वय ६५), वैशाली विनायकराव जाधव (वय ६०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादी महिलेने पती विश्वजीत यांच्याविरोधात लग्नाआधी २०१८ मध्ये घोले रोड येथील घरी दारू व ड्रग्ज देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याचे आरोप केले आहेत. इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नि स्वतःच्या नावावर करून घेतली.
फिर्यादीच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या कार परस्पर विकल्या. तसेच फिर्यादी यांचे एक कोटी ७० लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.