Home शासकीय 5 वी, 8 वी च्या वार्षिक परीक्षा सर्व शाळांनी आपल्या स्तरावर घेण्याचे आवाहन

5 वी, 8 वी च्या वार्षिक परीक्षा सर्व शाळांनी आपल्या स्तरावर घेण्याचे आवाहन

14 second read
0
0
35

no images were found

5 वी, 8 वी च्या वार्षिक परीक्षा सर्व शाळांनी आपल्या स्तरावर घेण्याचे आवाहन

 

       कोल्हापूर  : शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 5 वी आणि 8 वी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यता प्राप्त शाळांच्या इयत्ता 5 वी आणि 8 वी साठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्याचे निर्देश असून हा शासन निर्णय सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे. सर्व शाळांनी सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता 5 वी व 8 वी च्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करुन यशस्वीपणे पार पाडाव्यात. यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ) मीना शेंडकर यांनी केले आहे.

परीक्षा व्दितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार असून या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता 5 वी ला प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा, गणित व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता 8 वी साठी प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन 2 म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे. परीक्षेकरिता प्रत्येक शाळेने शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करुन परीक्षा घ्यावयाची आहे. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या mss.ac.in या संकेत स्थळावर इयत्ता 5 वी आणि 8 वी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करुन दिलेले आहेत, त्याचा उपयोग करुन प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.

 इयत्ता 5 वी व 8 वीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुर्नपरीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. पुनर्परीक्षेचे आयोजन देखील उपरोल्लेखित शासन निर्णयाप्रमाणे सबंधित शाळांनी करावयाचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबंधित शासन निर्णयात दिले आहेत.

 नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन (PAT) चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ चे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यमापन २ चे आयोजन दिनांक २, ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.

इयत्ता 3 री, 4 थी, 6 वी, 7 वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT हीच संकलित मूल्यमापन 2 असेल त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन-2 घेण्यात येणार नाही. उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन 2 शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करुन घ्यावयाचे आहे.

 इयत्ता 5 वी आणि 8 वी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) ही संकलित मूल्यमापन 2 असणार नाही, या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित शाळांनी दिनांक 2, 3 व 4 एप्रिल 2024 या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे या चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे, असे जिल्हा परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …