
no images were found
वेळेत अर्ज निकाली काढले नाहीत तर कारवाई होणार – दिलीप शिंदे
कोल्हापूर : शासनाकडून गरजूंना वेळेत सेवा मिळावी या हेतूने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणला गेला. प्रत्येक नागरिकाला कायद्यानुसार तत्परतेने लोकसेवा मिळाव्यात हा हेतू कायद्याचा असून जर वेळेत आलेले अर्ज निकाली निघत नसतील तर आम्हाला नियमानुसार कारवाई करावी लागेल, अशा सूचना दिलीप शिंदे, राज्य आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग, पुणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. राज्य आयुक्त श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनातील महसूल व इतर विभागांचा विविध सेवांच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी विभागनिहाय असलेल्या सेवांचा तपशील त्यांनी जाणून घेतला. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्रांत व तहसिलदार उपस्थित होते.
प्रत्येक कार्यालयात सेवा कायदा, तसेच नागरिकांसाठी आवश्यक माहितीचे फलक लावा, ऑफलाईन अर्ज न घेता ऑनलाईन अर्ज घ्या, अपीलातील प्रकरणे कायद्याने दिलेल्या वेळेत निकाली काढा, लोकांचे समाधान झाल्याची खात्री करा, महसूल विभागाने सर्वच कार्यालयांचा सेवांबाबत वारंवार आढावा घ्यावा, कायद्याला अपेक्षित असलेल्या सेवा वेळेत आणि त्याच दराने आकारणी करून देतात की नाही याची खात्री करा अशा पद्धतीच्या सूचना राज्य आयुक्त श्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य आयुक्तांना दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, जिल्हा प्रशासन चांगले काम करीत असून आम्ही उर्वरीत अर्ज व प्रकरणेही वेळेत निकाली काढू, आवश्यक प्रशिक्षणांचे आयोजन करुन पोर्टलबाबतची माहिती सर्वांना देवू. कार्यालयीन स्वच्छता, सूचना फलक, सेवांबाबतचे तपशील लावून जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र पुर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खबरदारी घेवू, असे आश्वासन त्यांनी आयुक्तांना दिले.
लोकसेवा देण्यात कोल्हापूर जिल्हा विभागात दुसरा
97 टक्के कामकाजाबद्दल आयुक्तांकडून प्रशासनाचे अभिनंदन
सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यामधे कोल्हापूर जिल्हा सांगली पाठोपाठ विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 पासून 5 मार्च 204 पर्यंत 7,66,779 अर्ज आले. यातील 692468 निकाली निघाली. 74311 प्रक्रियेत आहेत. यातील अर्जदारांकडे प्रलंबित 56132 आहेत. यातील 690986 मंजूर झाले आहेत. तर 1482 अर्ज फेटाळले. अशा प्रकारे वेळेत निकाली काढलेल्या अर्जाची टक्केवारी 97 टक्के आहे. याबद्दल आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच उर्वरीत 3 टक्के अर्जही आता निकाली काढण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले.
कोल्हापूर शहरातील विविध कार्यालयांमध्येही प्रत्यक्ष जावून दिल्या भेटी
दिलीप शिंदे, राज्य आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग, पुणे यांनी बैठकीआधी शहरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिलदार कार्यालय तसेच एका आपले सरकार सेवा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी सूचना फलक, अर्ज नोंद वही रजिस्टर पाहिली व उपस्थित अर्जदारांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी अपीलातील आलेल्या अर्जांवर कोणत्या प्रकारे कार्यवाही केली जाते याची प्रक्रिया तपासली. तसेच कायद्याच्या अनुषंगाने उपस्थितांना सूचना दिल्या.