no images were found
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात चुलता-पुतण्याचा जागीच मृत्यू
दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील भागवतवाडीजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्ता ओलांडत असताना ट्रॅक्टर व ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात चुलता-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचालक बिभीषण बालाजी हाके (वय ३२) आणि वैभव सुधाकर हाके (वय १८, रा. घोटाळा बंडगरवाडी, ता. बसवकल्याण, रा. कर्नाटक) अशी मृत्युमुखी पडलेल्या चुलत्या-पुतण्याची नाव आहेत. दौंड तालुक्यातील पाटस गावाजवळील भागवतवाडी येथे गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील पाटस येथील भागवतवाडीजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्ता ओलांडत असताना पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने (के.ए. ३९/९४५५) ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेनंतर ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात ट्रकचालक बिभीषण हाके व त्यांचा पुतण्या वैभव हाके यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस शिपाई समीर भालेराव, संदीप कदम, हनुमंत भगत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांतून मृतदेह बाहेर काढले आणि तब्बल दोन तासांनंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आलं.