
no images were found
रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा; १४ कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेची लूट
सांगली: सांगलीमध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. सांगली मिरज रोडवर असणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सात ते आठ जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून रिलायन्स ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला
पोलीस असल्याचा बनाव करत सांगली शहरातल्या मिरज रस्त्यावर भरदिवसा रिलायन्स ज्वेलरी शॉपवर दरोडा टाकण्यात आला आहे. यानंतर दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत शॉपमध्ये असणाऱ्या कर्मचारी आणि ग्राहकांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना ओलिस ठेवले. तसेच विरोध करणाऱ्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली.
त्यानंतर हे दरोडेखोर दुकानात असणारे सोन्याचे दागिने बॅगेत भरून पसार झाले. यावेळी एका ग्राहकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारात दुकानातील काच फुटली. या गोळीबारात ग्राहक वाचला पण फुटलेल्या काचेवर पडून जखमी झाला. पळून जाताना दरोडेखोरांनी दुकानात असणारे सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीन देखील लंपास केली. यावेळी एक डिव्हीआर पडून फुटल्याने तो तिथेच टाकून दरोडेखोरांनी पळ काढला, दोन गाड्यांतून हे दरोडेखोर घटनास्थळी आल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तसेच पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने धाव घेतली. भरदिवसा पडलेल्या या दरोड्याची बातमी पसरताच रिलायन्स ज्वेलर्स समोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या शोधासाठी तातडीने पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी हे करण्यात आली आहेत.
या दरोडयात सुमारे १४ कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लूटण्यात आल्याचे समोर आले आहे.मात्र, भर दिवसा शहरातल्या मध्यवर्ती असणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या धाडसी सिनेस्टाईल दरोड्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दरोड्यातील काही आरोपी व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. दरोडा टाकल्यानतंर दरोडेखोरांनी मिरजेच्या दिशेने पळ काढल्याचे समोर आले आहे. तसेच हे दरोडेखोर परराज्यातील असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.