
no images were found
दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
गोविंदांबाबतच्या निर्णयांचे केले स्वागत
मुंबई : दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येत असून जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासह गोविंदांचा विमा उतरविण्याच्या निर्णयाचे दहिहंडी समन्वय समितीने स्वागत केले असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन, आमदार प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, डॉ. बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडीला क्रीडा क्षेत्रामध्ये साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असून समन्वय समितीचे पदाधिकारी आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली आहे, ही समिती दहीहंडीसाठी उभारण्यात येणारे मानवी मनोरे आणि इतर बाबींचा अभ्यास करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरुण पाटील, सचिव सुरेंद्र पांचाळ, गीता झगडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.