
no images were found
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत सहभागी व्हावे
कोल्हापूर : धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्यासाठी धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये पसरविण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाचे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात येणार आहे.
यासाठी शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे. बहुभुधारक शेतकरी स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक धारणा आहे.
या योजनेत गावाचा उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवावा जेणेकरुन गावातील जलस्त्रोत गाळमुक्त होवून पाणी साठ्यात वाढ होईल. या योजनेंतर्गत जलसाठ्यांमधुन गाळ काढण्याची अंमलबजावणी ही अशासकीय संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी अशासकीय संस्था नेमणे आवश्यक आहे. शासनामार्फत मृद व जलसंधारण विभागाचे अशासकीय संस्था नेमणुकीचे निकष देण्यात आलेले आहेत.
निकष पुढीलप्रमाणे : अशासकीय संस्थेने नोंदणी प्रमाणपत्रासह त्यांचे ३ वर्षांचे ऑडीट केलेले कागदपत्रे सादर करावे. गाळ काढण्यासाठी घेतलेल्या कामांचा संख्येच्या प्रमाणात जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत व जलसाठा पातळीवर स्मार्टफोनवर डेटा प्रविष्ट करण्यास सक्षम असणारे पुरेसे कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यास अशासकीय संस्था सक्षम असावी. अशासकीय संस्थेकडे यापूर्वी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, जलसाठे, ग्रामीण विकास, जलसंधारण अंतर्गत यशस्वीरीत्या कामे करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अशासकीय संस्थांकडे संनियंत्रण आणि मूल्यांकनावर काम करण्याचा अनुभव असावा. अशासकीय संस्थेने वरील सर्व निकषांबाबतची कागदपत्रे (प्रमाणपत्रे) समितीस सादर करावीत. या निकषांमध्ये मोडणाऱ्या सर्व अशासकीय संस्थांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आपले प्रस्ताव मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी, कोल्हापूर या कार्यालयास त्वरीत सादर करावेत.