no images were found
सफाई कामगारांचे प्रश्न शासन स्तरावरून तातडीने सोडवू – एम. वेंकटेशन
कोल्हापूर, (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या युनियन मार्फत सादर करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून त्यांचे प्रश्न शासन निर्णयातील तरतुदीनुसार शासनास कळवून शासन स्तरावरून तातडीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन यांनी दिले.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा प्रशासन कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध निवेदने आयोगास देण्यात आली.
या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, नगरपालिका प्रशासन जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व इतर विभागांचे विभाग प्रमुख व सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामाजिक न्याय विभागाकडील सुरेखा डवर व अरुण कोळी हे यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक सदानंद बगाडे तर सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले.