
no images were found
चर्मकार विकास महामंडळांतर्गत कर्ज प्रकरणे पूर्ण करुन लोकांना लाभ द्या – धम्मज्योती गजभिये
कोल्हापूर: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कोल्हापूर या महामंडळाकडे असणाऱ्या एन.एस.एफ.डी.सी.महिला समृध्दी व मायक्रो या थेट योजनांचे कर्ज प्रस्ताव निकाली काढून जास्तीत जास्त लोकांना लाभ द्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले.
समाजकल्याण येथील जिल्हा कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध सामाजिक संघटना व लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या व सन 2023-24 मधील सर्व योजनेचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीस अध्यक्ष स्थानी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा व्यवस्थापक एन.एम. पवार, महाराष्ट्र चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ मोरे, जिल्हा अध्यक्ष विठठल नांगरे प्रत्रकार युवराज मोरे, दगडू माने, पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी विविध योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे आवाहन केले. बैठकीचे प्रास्ताविक केले. जिल्हा व्यवस्थापक एन.एम. पवार यांनी सांगता केली.