no images were found
निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार यांचा नवा मोठा निर्धार
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खवळली होती.पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी राजीनामा मागे घेतला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नागरिकांशी संवाद साधत आहेत. शरद पवार यांनी सोलापुरातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून ते सोलापुरात आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा निर्धार बोलून दाखवला आहे. आता पुनश्च हरिओम करायचं आहे. वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. हाच निर्धार मी मनाशी पक्का केला आहे, असं शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ संघटनेचं काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क करायचा ठरवलं होतं. पण तो गैरसमज झाला. आज तो दूर झाला याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले. पुनश्च हरिओम
कामाची सुरुवात तर करणारच होतो. माझी कामाची अनेक वर्षाची एक पद्धत आहे. कामाची सुरुवात करण्यासाठी मी दोन पैकी एका ठिकाणाची निवड करतो. एक तर सोलापूर किंवा कोल्हापूर. सोलापूरपासून दौऱ्यावर जावं हा विचार होता. त्यामुळे मी आलो. सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं हे शहर आहे. त्यामुळे मी इथे आलो. मला याचं समाधान आहे, असं सांगतानाच या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटावं त्यांचा उत्साह वाढवावा. पुनश्च हरिओम करावं. वेगाने महाराष्ट्राचं चित्रं कसं बदलता येईल याची काळजी घेणं हे मी ठरवलंय, असं पवार म्हणाले.
बदल घडवून आणायचा असेल तर आम्हाला लक्ष घालावं लागेल. काम करावे लागेल. लोकांच्या सुखदु:खाशी समरस व्हावं लागेल. ते आम्ही करू. काम करावं लागेल. त्याशिवाय चित्र बदलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.