
no images were found
कुटुंबाच्या डोळ्यादेखत दोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
कोल्हापूर : जोतिबाचे दर्शन करून पन्हाळगड पाहण्यासाठी आलेल्या खानापूर (ता. भुदरगड) येथील दबडे कुटुंबातील इंद्रनील अरुण दबडे हा अडीच वर्षांचा मुलगा चारचाकीखाली सापडून जागीच ठार झाला. त्याच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने पन्हाळगड हादरला
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी गेले होते. पन्हाळागडावर पर्यटनासाठी आलेल्या सहपरिवार दबडे कुटुंब तबक उद्यानासमोर दुपारी तीनच्या दरम्यान चहा पिण्यासाठी थांबले होते. या वेळी त्यांचे मोबाईलवर फोटोसेशन सुरू होते. आपल्या आईच्या हाताला धरून उभा असलेला इंद्रनील रस्त्यापलीकडे उभ्या असलेल्या आपल्या आजोबांकडे आईचा हात सोडून अचानक निघाला.
त्यावेळी सज्जाकोठीकडून भरधाव आलेल्या करमाळा येथील सुनीलकुमार हांडे यांच्या मोटारी (एमएच ४५ एएल ६२०३)खाली तो आला. गाडीच्या उजव्या बाजूकडील चाकाखाली तो आल्याने मागील चाकही त्याच्या डोक्यावरून गेले. यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.