no images were found
शेतीला मिळणार सौर ऊर्जेची वीज स्वस्तात
मुंबई : शेतीपिकांना हमीभाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या वीजेच्या थकबाकी आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे शेतकऱ्यांना आता स्वस्तात वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
‘राज्यात शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना २ प्रकल्प राबवला जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या जाणार आहेत. तीस वर्षांच्या करारावर या जमिनी घेतल्या जाणार असून याबदल्यात शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. तसेच यामध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढही होणार आहे. तसंच, या योजनेकरता सरकारी जमिनींचाही वापर केला जाणार आहे.’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल. सध्या आम्हाला सात रुपये दराने वीज उपलब्ध होते, ती वीज आम्ही शेतकऱ्याला दीड रुपये दराने देतो. परंतु, सोलारची वीज सरकारला तीन ते साडेतीन रुपयांनी मिळाल्यास शेतकऱ्यांना आणखी स्वस्तात वीज उपलब्ध होणार आहे. तसंच, सबसिडीतही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शिवाय, सोलारची वीज दिवसाही मिळेल. तर, असं निर्णय घेणारं देशातील पहिलं राज्य ठरणार आहे.’ अशी माहिती फडणवीसांनी दिली. याव्यतिरिक्त, वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.