
no images were found
राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, आमदार पाटील विरुद्ध महाडीक गटाचा सामना होणार
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या २१ जागांसाठी आता ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही गटांत सरळ दुरंगी लढत होणार दरम्यान, आज उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.
‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले होते. पंधरा दिवसांच्या मुदतीत एकूण १०६ जणांनी माघार घेतली. हातकणंगले, करवीर, पन्हाळा ,राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या राजाराम कारखान्याचे १३ हजार ५३८ सभासद आहेत. त्यामध्ये १२९ ”ब” वर्ग सभासदांचा समावेश आहे.गट क्रमांक पाच व अनुसूचित जाती जमाती गटवगळता सर्व गटांत दुरंगी लढत होणार आहे. छत्रपती राजाराम सहकरी साखर कारखान्यासाठी 23 एप्रिलला मतदान तर 27 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे.दोन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे प्रचाराला आता अधिकच रंगत येणार आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक व विरोधी गटाचे नेते माजी आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार यंत्रणा अधिकच सक्रिय केली आहे.