no images were found
तीन वर्षांचा डुग्गू घराबाहेर खेळत असताना कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला
डुग्गु रस्त्याने खेळत होता, इतक्यात त्याच्याजवळ आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत काही अंतरावर नेलं.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरात शहरातील वाठोडा परिसरातील शिवजी पार्कजवळ घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. डुग्गू दुबे असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. दुबे कुटुंबीय वाठोडा परिसरात भाड्याने राहतात. घटनेच्या दिवशी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा डुग्गू घराबाहेर खेळत असताना आठ ते दहा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांची टोळी त्याला खेचून जाण्याचा प्रयत्न करत होती. हा सर्व प्रकार एका घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर घाबरलेला मुलगा जोरात ओरडू लागला. त्यामुळे त्याचे ओरडणे आणि रडणे ऐकून त्याची आई धावत घराबाहेर आली आणि कुत्र्यांचा पाठलाग करून आपल्या मुलाला सुखरूप वाचवले. तिने दगडाने कुत्र्यांना हाकलून लावलं. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा वावर असून नागपूर महानगरपालिका याबाबतीत गंभीर नसल्याने एखाद्या मुलाचा जीव गेल्यानंतरच मनपाला जाग येईल का? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. मुलाच्या आईने वेळेत धाव घेतली नसती, तर कदाचित या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला असता.