no images were found
उंब्रजमधील सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’
सातारा : सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म ऍक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख मयूर महादेव साळुंखे (वय ३४, रा. कालगाव, ता. कऱ्हाड), पंकज अमृत यादव (वय २७, रा. भवानवाडी, ता. कऱ्हाड), शाहरुख रफिक मुल्ला (वय ३०, रा. मसूर, ता. कऱ्हाड), सूरज सूर्यकांत जाधव (वय २८, रा. वाघेश्वर पो, मसूर, ता. कऱ्हाड), अमोल बाजीराव जाधव (वय ३१, रा. वाघेश्वर, ता. कऱ्हाड), अक्षय अनिल कोरे (वय २९, रा. ब्रम्हपुरी, मसूर, ता. कऱ्हाड), प्रकाश आनंदराव यादव (वय ३३, रा. ब्रम्हपुरी मसूर, ता, कऱ्हाड) अशी मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी वरील टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली. या टोळीने दहशत पसरविण्यासाठी उंब्रज परिसरातील इतर गुन्हेगारांना एकत्र करून दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपींविरुद्ध पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्फतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून नमूद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावून या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी रंणजीत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2022 पासून सहा मोक्का प्रस्तावांमध्ये 99 इसमांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच 16 इसमांविरुद्ध हद्दपारसारखी कारवाई करण्यात आली आहे.
यापुढेही अशाच कारवाया करण्यात येणार आहेत. मोक्का प्रस्ताव मंजुरी करता पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय देवकुळे, श्रीधर माने यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.