
no images were found
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलं आरोपपत्र; अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते.ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे.अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.याचा अर्थ अजित पवारांना ईडीकडून दिलासा मिळाला असं नाही. कारण गरज पडल्यास आम्ही पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढील आरोपपत्रात अजित पवार यांचं नाव येणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2021 मधे सक्तवसुली संचालनालयानं या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसून पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्र आणि अजित पवार यांच्याशी संबधित प्रश्नांवर उत्तर देण्याचे टाळले.
जुलै 2021 मध्ये ईडीने या या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ईडीने त्या वेळी हे स्पष्ट केले होते की, ही संपत्ती सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेसच्या नावावर आहे आणि जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर आहे. या कारखान्याचा लिलाव कमी किंमतीत झाल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.
कारखाना खरेदी केल्यानंतर या कंपनीने तात्काळ हा कारखाना लीजवर दिला होता. यात अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल कंपनीची अधिक भागीदारी असल्याचं आढळून आलं होतं. जेव्हा ही डील झाली तेव्हा अजित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन होते. आपल्याच कंपनीला साखर कारखाना लीजवर देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणीच हे आरोपपत्रं दाखल करण्यात आलं आहे.