no images were found
सारथीच्या वतीने तांत्रिक उद्योजकता विकास मोफत प्रशिक्षण कार्यक्रम
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे द्वारे पुरस्कृत मराठा समाजातील (मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रवर्गातील (लक्षित गटातील)) युवती व महिलांकरितामहाराणी सईबाई सारथी महिला सक्षमीकरण योजनांतर्गत तांत्रिक उद्योजकता विकास मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) कोल्हापूर यांच्याद्वारे करण्यात येत आहे. ज्या मध्ये पाचगाव, कोल्हापूर येथे ३० दिवस कालावधीच्या बेकरी प्रॉडक्ट मेकिंग तर महागाव-गडहिंग्लज येथे १५ दिवस कालावधीचा राईस प्रोसेसिंग वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाची विस्तृत माहिती व इच्छुकांचे प्रवेश अर्ज भरून घेण्यासाठी एम.सी.ई.डी. कोल्हापूर जिल्ह्याचे वतीने सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत हॉल, महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे तर दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत हॉल, पाचगाव ता. करवीर येथे एक दिवसीय मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेश अर्ज व अधिक माहिती करिता महागाव ता. गडहिंग्लज साठी धन्वंतरी देसाई, कार्यक्रम सहयोगी, एम.सी.ई.डी., मोबाईल क्रमांक 8275973508 तर कोल्हापूरसाठी राधा मेस्त्री मोबाईल क्रमांक 9326662717 यांच्याशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) कोल्हापूर येथील प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे, मोबाईल क्रमांक 9403078774 व वनिता पाटील, मोबाईल क्रमांक 9422810863 एम.सी.ई.डी. द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला, कोल्हापूर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केले आहे.
मराठा समाजातील युवती, महिलांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, या प्रशिक्षणात उपस्थित इच्छुकांकडून प्रवेश अर्ज भरून येण्यात येणार असून प्राप्त प्रवेश अर्जामधुन निवड समिती मार्फत प्रत्यक्ष मुलाखत घेऊन प्रशिक्षणार्थीची निवड या कार्यक्रमाकरीता करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवार मराठा समाजातील (मराठा-कुणबी प्रवर्गातील) असणे आवश्यक आहे. शिक्षण किमान ८ वी पास, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी, तसेच उद्योग करण्याची प्रबळ इच्छा व १८ ते ४५ वयोगटातील असावा. इच्छुकांनी परिचय मेळाव्यास येताना सोबत शाळा सोडल्याचा दाखला, १० वी चे प्रमाणपत्र, जन्म दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड ही आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
मराठा समाजातील लक्षित गटातील युवती व महिलांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतः स्वयंरोजगार निर्माण करावा, या उदेशाने या कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थीना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, बाजारपेठ व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग, विविध शासकीय कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्य प्रणाली, तसेच उद्योम व्यवस्थापन याबाबत शासकीय अधिकारी व तज्ञांमार्फत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय बेकरी प्रॉडक्ट मेकिंग तसेच राईस प्रोसेसिंग बाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.