no images were found
मध्यरात्री १०० फुट खोल दरीतून पोलिसांनी वाचवला तिघांचा जीव
कोल्हापूर :साखरप्याजवळील घाट उतरत असताना कोल्हापूरच्या दाम्पत्याला कार थेट १०० फुट खोल दरीत मध्यरात्री दोन वाजता कोसळली. यात पती-पत्नीसह चार वर्षांची मुलगी होती. खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता तातडीने ११२ क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या १५ मिनिटात पोलिसांनी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला. गाडी थेट दरीत कोसळल्यानंतर सरळ खाली गेल्याने मोठा अनर्थ टळला. देवरूख पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं दाम्पत्याचा जीव वाचला आहे.
याबाबतची माहिती अशी की, रात्री २ वाजून ९ मिनिटांनी सिद्धी मढवळ यांचा ११२ क्रमांकावर फोन आला. ‘आमचा अपघात झाला असून आम्हाला तत्काळ मदत हवी आहे’, असे त्यांनी सांगितले. पोलिस ठाण्यात राहुल गायकवाड होते. ते सहकाऱ्यांसह १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. कोल्हापूरचे विनायक मढवळ (वय 33), पत्नी सिद्धी मढवळ (वय ३२) आणि त्यांची मुलगी मीरा (वय ४) हे कारने (एमएच-०९- एफजे-८९७२) रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून कोल्हापूरला येत होते. साखरप्यापासून पुढे २ किमी अंतरावर मुरडे घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोर रस्ता दिसून आला नाही आणि याच काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, आयुष्याची दोरी बळकट असल्याने सरळ खाली गेली.
त्यातही न घाबरता सिद्धी मढवळ यांनी सर्व नातेवाईक, मैत्रिणी यांना मोबाईलवरून लोकेशन पाठविले आणि ११२ या हेल्पलाइनवर फोन केला. समोरून तत्काळ प्रतिसाद मिळाला. पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. दोरीच्या साह्याने खाली दरीत उतरून गाडीची डिकी उघडून प्रथम मुलगी मीरा हिला त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर विनायक व सिद्धी यांना बाहेर काढून सुखरूप वर आणले. देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रू आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.