no images were found
गडहिंग्लजच्या जवानाने गोठ्यात जाऊन केली आत्महत्या
कोल्हापूर : चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झालेला सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील एका अविवाहित जवानाने टोकाचे पाऊल उचलत जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३, राहणार धनवाडी तालुका गडिंग्लज) असे जवानाचे नाव आहे. जवानाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे. पुण्यातील 109 इंजिनिअरिंग रेजिमेंटमधून ते लष्करात भरती झाले होते.
मिळालेली माहिती अशी की, शिवानंद आरबोळे गेल्या चार वर्षांपासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते. सध्या ते राजस्थानमधील कोटामध्ये कर्तव्यावर होते. अविवाहित असलेल्या शिवानंद लग्नाच्या बेताने 15 दिवसांपूर्वीच गावी सुट्टीवर आले होते. कुटुबीयांकडून लग्नासाठी स्थळ पाहण्यात येत होती. त्यांचे मोठे बंधूही लष्करात कार्यरत असून ते सुद्धा सुट्टीवर आले आहेत. शिवानंद कुटुंबीयांसोबत शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी शेतामध्येच सर्वांसोबत जेवण केले होते. त्यानंतर अंघोळ करायला जातो म्हणून ते घरी निघून आले. घरी आल्यानंतर त्यांनी नायलॉनची दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आई वडिलांसह भाऊ सायंकाळी घरी आल्यानंतर शिवानंद यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता. शिवानंदने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेनाही. शिवानंद च्या पश्चात आई वडील भाऊ आणि भावजय असा परिवार असून शिवानंदने उचललेल्या या टोकाच पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे.