
no images were found
अवचितवाडीत पोल्ट्री व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यु
राधानगरी : तालुक्यातील अवचितवाडी येथे पोल्ट्री फार्म मालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आनंदा हरी किरूळकर (वय ४५) असे या मृताचे नाव आहे. आनंदा यांच्या शरिरावरील व्रण पाहून त्याचा घातपात करून त्याला ठार मारल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आनंदा याचा मृतदेह त्याच्याच पोल्ट्री फार्मच्या शेजारी पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेची वर्दी केळोशी बु॥ पोलीस पाटील शशीकांत दिघे व खामकरवाडीच्या दिपाली ऱ्हायकर यांनी राधानगरीपोलिस ठाण्यात दिली.
आनंदा किरूळकर याचा गावापासून हाकेच्या अंतरावर स्वतःचा पोल्ट्री फॉर्म आहे. मुख्य रस्त्याला लागूनच हे पोल्ट्री फार्मचे शेड असल्याने लोकांची वर्दळ असे. पण काल, गुरुवारी रात्री उशिर झाला तरी ते घरी आले नाहीत. म्हणुन त्यांच्या पत्नी संपदा व मुलगा अनिकेत पोल्ट्री फार्मकडे गेले. मात्र, आनंदा त्याठिकाणी नसल्याने ते घरी गेले. फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होत नव्हता.
दरम्यानच, आज, शुक्रवार सकाळी गावातील काही लोकांना आनंदा याचा मृतदेह पोल्ट्री फार्मच्या शेजारीच आढळून आला. ही बातमी गावात समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे पाठवला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.