
no images were found
जोतिबा यात्रेत आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू
कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी आलेल्या दोन भाविकांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला. प्रमोद धनाजी सावंत (वय 20, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) याचा सकाळी दरीत पड़ून मृत्यू झाला. दुसरे भाविक संजय दत्तात्रय शिंदे (वय ५९, रा. भांडूप, मुंबई) यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मानाच्या सासनकाठ्या मंदिरातून बाहेर जाताना कमानीचे दगड पडून दोन भाविक जखमी झाले. सूरज हणमंत उधाळे (वय २७) आणि अथर्व विजय मोहिते (वय १८, दोघे रा. बहे बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.
जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी डोंगरावर लाखो भाविकांची गर्दी जमली होती. मित्र आणि नातेवाईकांसोबत यात्रेसाठी डोंगरावर पोहोचलेला प्रमोद सावंत हा तरुण पहाटे पावणेसहाच्या सुमारास प्रातःर्विधीसाठी दक्षिण बाजूच्या डोंगर उतारावर गेला. त्यावेळी अंधारात अंदाज न आल्याने तो उंच कड्यावरून खाली सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईहून आलेले भाविक संजय शिंदे हे सकाळी पावणेदहाच्या सुमारास डोंगरावर चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
जोतिबा यात्रेच्या मुख्य सोहळ्यावेळी सासनकाठी कमानीला लागल्यामुळे कमानीतील दगड निखळून दोन भाविकांच्या डोक्यामध्ये पडला. यामध्ये सुरज हणमंत उदाळे व अथर्व विजय मोहिते हे जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. यापैकी एकावर खासगी तर दुसर्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.