
no images were found
केएमटीचे कर्मचारी संपावर, बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल
कोल्हापूर ; आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची नोटीस प्रशासनाला दिली होती. त्यानुसार म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक व जनरल सेक्रेटरी आनंद आडके यांनी आपली संघटना संपावर जात असल्याचे पत्रकाव्दारे कळविले आहे.यामुळे मुक्कामाला गेलेल्या 18 बसेस वर्कशॉपमध्ये आल्या असून . जवळपास 60 ते 70 बसेस कार्यशाळेतच उभ्या असल्याने संपाचा परिणाम आता शहरातील वाहतूक व्यवस्थेवर जाणवू लागला असून प्रवाशांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. केएमटी कडील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करणे, पुण्यावरुन रोस्टर तपासून आणल्याने सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, ज्येष्ठतेप्रमाणे ड्युटीज लावणे आणि इतर नवीन दुरुस्त केलेल्या टाईम टेबलची अंमलबजावणी करणे आणि इतर मागण्यांबाबत आपल्याकडे तारीख व वेळेची मागणी करण्यात आली होती. ती अद्याप मिळाली नाही. तसेच मागण्यांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासंबंधी प्रशासक व परिवहन व्यवस्थापक यांना संप नोटीस दिली असून त्यावर दि. ३० मार्च २०२३ पर्यंत निर्णय घेतला नसल्याने मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी दिला होता. या पत्रावर केएमटीकडील सर्व कर्मचाऱ्यांनी चर्चा करुन जोपर्यंत मागण्यासंबंधी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही, असं ठरल्याने आज केएमटीच्या वर्धापन दिनाच्या मध्यरात्रीपासूनच सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत.
दररोज 60 ते 70 बसेस मधून तब्बल 40 हजार प्रवासी प्रवास करत असतात. यातून महापालिकेला लाखोंचे उत्पन्नही मिळत असते मात्र कर्मचारी संपावर गेल्याने याचा फटका महापालिकेसह प्रवाशांना देखील बसू लागला आहे. महापालिकेचे उत्पन्न तर बुडतच असून दुसऱ्या बाजूला शहरातील विविध केएमटी बस स्टॉपवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
दरम्यान या संपात शशिकांत पाटील यांनी आपली संघटना भाग घेणार नसल्याचे जाहीर केले असले तरी फुटीचा फायदा प्रशासन घेऊन यासाठी म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे प्राचार्य शहाजी कांबळे यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.