
no images were found
शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी ‘लाईफ लाँग लर्नर’ अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यस्त राहावे आणि काळानुरुप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन आय.आय.टी. कानपूरचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस होते. ते समारंभात ऑनलाईन सहभागी झाले. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य विराजमान होते.
विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ दोन वर्षांनी ऑफलाईन स्वरुपात झाला. त्यामुळे उपस्थितांचा आणि स्नातकांचा उत्साह अतिशय ओसंडून वाहात होता.
प्रा. धांडे यांनी आपल्या दीक्षान्त मार्गदर्शनात निरंतर शिक्षण, मूल्ये आणि कौशल्ये या बाबींवर भर दिला. स्नातकांना विद्यापीठाची पदवी घेऊन आता जीवनाच्या ‘लाईफ लाँग लर्निंग’ या ‘थ्री-एल’ विद्यापीठात प्रविष्ट होत असल्याची जाणीव करून देताना प्रा. धांडे म्हणाले, जीवनाच्या या विद्यापीठात कोणती परीक्षा नाही की गुण नाहीत, प्रमाणपत्र नाही की लेक्चर्स आणि प्रॅक्टिकलही नाहीत. मात्र, या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी अनुभवातून शिकत आहेत. आजचे जग हे फार गतीने बदलते आहे. कोविडनंतर तर या बदलांचा वेग अधिकच वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत, काही कौशल्ये कालबाह्य होत आहेत. तर काही नवी कौशल्ये उदयास येत आहेत. या कौशल्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आज एखाद्याने स्वतःहून नवीन कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे, जे आजच्या जगात अतिशय आवश्यक बनले आहे.
मानवी मूल्ये आणि नैतिकतेचा पाया हा जीवनाचा मूलभूत घटक असल्याचे सांगून प्रा. धांडे म्हणाले, अनुभव हा महान शिक्षक आहे. तुम्ही आता या लाइफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल आणि तुमचा शिक्षक म्हणून अनुभव घ्याल. या विद्यापीठात पदवी नाही. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहाल. ही एक प्रक्रिया आहे जी तुमचे जीवन सतत समृद्ध करते. जग आज खूप गुंतागुंतीचे बनले आहे. विचलित करणाऱ्या बाबी भोवताली अधिक आहेत. अनेक मोहमयी पण धोकादायक मार्ग तुमच्या आजूबाजूला नेहमी खुणावत असतात. वैयक्तिक सचोटी आणि आर्थिक प्रामाणिकपणा याच त्या महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्या या जगात आत्मसात करणे आवश्यक आहे.