no images were found
शहरातील इतर विकास कामे लवकरच मार्गी लावू : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार स्थापन झाल्यापासून शहरातील मुलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांना कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे. यातून शहरातील बहुतांश प्रमुख विकास कामे मार्गी लागली आहेत. परंतु, अजूनही काही भागातील विकास कामे शिल्लक आहेत. स्थानिक नागरिकांच्या मागणीस मान देवून लवकरच शहरातील इतर विकास कामे मार्गी लावून शहराचा विकासाच्या दृष्टीने काम करू असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ५ वी गल्ली शाळीग्राम हॉस्पिटल येथील रस्ता डांबरीकरण करणे या कामास रु.१० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज भागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्घाटनाच्या सुरवातीस राजारामपुरी परिसरातील जेष्ठ नागरिकांनी गेले चार वर्षात दुर्लक्षित झालेल्या कामांना निधी देवून चांगल्या दर्जाची विकास कामे करून घेतल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लोकाभिमुख व लोककल्याणकारी कामकाज सुरु आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी कोल्हापूर शहराला प्राप्त झाला आहे. सुरवातीच्या अडीच वर्षात ठप्प झालेली विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी देवून पूर्णत्वास नेली. शहराच्या विकासाचे व्हिजन आम्ही ठेवले असून, त्यास सरकार पूर्णत: पाठीशी आहे. शहरातील प्रश्नांची जाण असल्यानेच नागरिकांकडून निधी मागणी होत आहे आणि विकास कामांना निधी देवून ती पूर्ण करण्याकडे आपला कल आहे. आगामी काळात शहरातील उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधी मंजुरीकामी पाठपुरावा सुरु असून, लवकरच यास यश आलेले पहायला मिळेल, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, उपशहरप्रमुख मंदार तपकिरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, संजय पोवार, करण जाधव, नितीन पाटील, मंजुनाथ वणकुद्रे, धैर्यशील साळुंखे, महेश यादव, महेश भोसले, महमद सनदी, रुपाली चौगुले, सौ.दळवी, सौ.पवार, सौ.प्रधान, सौ.बिद्री यांच्यासह भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.