
no images were found
नवनिर्मित इचलकरंजी अंतर्गत नवीन तीनचाकी व चारचाकी नोंदणी मालिकेचे कामकाज 26 मार्च पासून सुरु
कोल्हापूर : नवनिर्मित इचलकरंजी अंतर्गत हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन तीनचाकी MH51B व परिवहन संवर्गातील चारचाकी MH51C नोंदणी मालिकेचे दि. 26 मार्च 2024 रोजी पासून कामकाज सुरु करण्यात येत आहे. नविन तीनचाकी MH५१B व परिवहन संवर्गातील चारचाकी व MH५१C पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 26 व 27 मार्च 2024 रोजी सकाळी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील, अशी माहिती इचलकरंजीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे-
पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे, धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर स्विकारली जाणार नाही, असे अर्ज बाद समजण्यात येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढताना SBI TRE, BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा, इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहिलेला असणे आवश्यक असेल. नवीन दोनचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकाबाबत दि. 26 ते 27 मार्च 2024 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत अर्जासोबत मूळ रक्कमेचा एकच डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) सादर करावा. दि. 26 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पसंती क्रमाकांच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ज्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाले असतील अशा नोंदणी क्रमांकांचा लिलाव दि. 28 मार्च 2024 रोजी करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते 3 या कालावधीत कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 28 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयात घेण्यात येईल. लिलावासाठी फक्त अर्जदार प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. लिलावासाठी येताना अर्जदाराने आपले ओळखपत्र व प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याकडे प्राधिकारपत्र व स्वत:चे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक व पत्ता अर्जावर लिहिणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक लिहिला नसल्यास यादीमध्ये नाव आले तरी आपला कोणताही हक्क आकर्षक नोंदणी क्रमांकावर राहणार नाही. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. आकर्षक नोंदणी क्रमांक घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपला क्रमांक आपोआप रद्द होईल. तथापी सदरचे शुल्क सरकार जमा हाईल आणि हे शुल्क परत करता येत नाही यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. मागणी केलेल्या आकर्षक क्रमांकाची पावती झाल्यानंतर त्याचदिवशी पावती घेण्याकरिता स्वत: हजर राहून पावती तपासून घ्यावी. दुसऱ्या दिवशी पावतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. आकर्षक क्रमांकाच्या नियमित पावत्या दि. 1 एप्रिल 2024 पासून सुरु करण्यात येतील. मागणी अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फीची खात्री करुनच जमा करावा. जरी नजरचुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असेही प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजीमार्फत कळविण्यात आले आहे.