
no images were found
भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन
पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२ वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे पुण्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जातात. नुकतेच त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीदरम्यान चिलचेअरवरून प्रचारसभेत भाग घेतला होता. तसेच, त्यांनी मतदानाचा हक्कदेखील बजावला होता. गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली होती. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.
पुणे आणि कसबा मतदारसंघात भाजप पक्षाचा विकास करण्यासाठी त्यांनी अनेक परिश्रम घेतले. संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास. गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला.