no images were found
केडीसीसी बँकेतील उद्धट कर्मचार्यांनी आपले वागणे बदलले नाही तर ठोकून काढू : राहूल चिकोडे
कोल्हापूर : निवृत्ती चौक या ठिकाणी असणाऱ्या केडीसीसी बँकेमधील कर्मचारी पेन्शनधारक वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्याबद्दल तसेच बँकेतील सुविधांचा लाभ न देत असल्याबद्दल अनेक तक्रारी भारतीय जनता पार्टीकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केडीसीसी बँकेच्या शिवाजी पेठ शाखेमध्ये जाऊन उद्धट कर्मचारी आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. संतप्त जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी तीव्र शब्दात बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांची कानउघडणी केली. वयोवृद्ध पेन्शन धारकांनी आपल्या तक्रारींचा पाढा यावेळी वाचला यामध्ये बँक पासबुक भरण्यास टाळाटाळ करणे, वृद्धांना शाखेमध्ये थांबू न देता खाली घालवणे, दुपारी दोन ते पाच या वेळेत पासबुक भरण्यासाठी पुन्हा बोलावणे, बँकेमध्ये चप्पल बाहेर काढायला लावणे यामुळे या वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. बँकेतील मुजोर कर्मचाऱ्यां विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांना जाब विचारण्यात आला. मुजोर कर्मचारी, अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय, धिक्कार असो धिक्कार असो निलंबित करा निलंबित करा मुजोर कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशा घोषणा देण्यात आल्या. खातेधारकांचे पासबुक अनेक वर्षे का भरले गेले नाही याचा जाब विचारण्यात आला. शाखा अधिकारी संजय कुऱ्हाडे हे देखील सदर प्रकरणामध्ये निरुत्तर ठरले त्यांनी झालेली चूक लक्षात आल्यानंतर तोंडी कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावर जोपर्यंत मुजोर अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी घेतली. आलेल्या सर्व पेन्शन धारकांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी शाखाअधिकारी यांच्या केबिन बाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर बँकेचे जनरल मॅनेजर यांचे फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे वरुठे आणि भोसले प्रशासकीय अधिकारी यांनी देखील या ठिकाणी येऊन शिष्टमंडळाची भेट घेतली. आलेले दोनही अधिकारी माहिती न घेता स्टाईल मध्ये शिष्टमंडळाशी बोलताना लेखी मागणी करा या वाक्यावर पुन्हा संतप्त जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व भाजपा शिष्टमंडळाने या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून लेखी मागणी द्या हि मुजोरी याठिकाणी चालणार नाही असा पवित्रा जिल्हाध्यक्ष यांनी घेतला. उद्धट कर्मचा-याचे निलंबन करण्याचा प्रस्ताव या अधिकाऱ्यांनी तात्काळ करावा अशी भूमिका घेतली. त्याचबरोबर जोपर्यंत जनरल मॅनेजर माने बँकेमध्ये येत नाहीत तोपर्यंत येथून जाणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला यावेळी वयोवृद्ध नागरिक आणि पदाधिकारी यांनी झुणका भाकरी खावून बँकेमध्ये ठिय्या मारून या घटनेचा निषेध केला.
अखेर मॅनेजर बँकेमध्ये दाखल झाले त्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण केली. आपल्या बँकांच्या सर्व शाखेतील मुजोर अधिका-यांमुळे बँक नाहक बदनाम होत असल्याचे सांगत या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या माने यांचा तीव्र शब्दांत निषेध यावेळी करण्यात आला. बँकेत ३ तास आंदोलन सुरु असताना सुमारे १ वर्षे ते ५ वर्षा पर्यंत अनेक नागरिकांची पासबुक भरून दिली जात नसल्याचे आढळले. हे सर्व मॅनेजर माने यांच्यासमोर जेष्ठ नागरिक व बँकेत आलेल्या ग्राहकांनी सर्व तक्रारीचा पाठा सर्व अधिकाऱ्यांसमोर वाचला.
शेवटी या शाखेतील मुजोर कर्मचा-याचे निलंबन व्हावे, व इतर सर्व निष्क्रिय कर्मचार्यांची चौकशी होऊन त्यांची बदली दुर्गम भागात करावी व नागरिकांना उत्तम सुविधा देण्यात यावी अन्यथा तीव्र संघर्ष करण्यात येईल असा इशारा बँकेचे मॅनेजर व इतर सर्व संबधित अधिका-यांसमोर करण्यात आला.वर्षानुवर्षे पासबुक भरून न देणे व पेन्शन धारकांना एक पेन्शन खात्यावर ठेवावी लागेल असे करून केडीसीसी बँक पेन्शन धारकांचे पैसे इतर कुठे वापरत नाही ना ? असा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, शिवाजी पेठ मंडळ अध्यक्ष गिरीश साळुंखे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत, भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अशोक लोहार, संतोष माळी यांच्यासह तक्रारदार वयोवृद्ध नागरिक उपस्थित होते.