तंत्रज्ञान अधिविभागात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
कोल्हापूर : तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे स्व-संरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. एस.एन. सपली यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच स्व-संरक्षणाचे धडे अवगत करणे ही काळाची गरज असल्याचे उद्गार काढले. सध्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रॅण्डमास्टर श्री. संदीप कृष्णा पाटील, सचिव, आर्मेचर बॉक्सिंग सेंटर यांनी केले. याप्रसंगी ग्रॅण्डमास्टर श्री. संदीप कृष्णा पाटील, प्रशिक्षिका गायत्री लिमकर, रसिका कांबळे व टीम यांनी स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले. तसेच, तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थींनी व विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिक करुन घेतले. यात स्वतःवर हल्ला झाल्यास हल्लेखोरांना ठोसे कसे व कोठे मारायचे, समोरून, बाजूने, पाठीमागून हल्ला झाल्यावर स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा उपक्रमांचा विद्यार्थींनी व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईल असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत महिला सक्षमीकरण कक्षाच्या अध्यक्ष सहाय्यक प्रा. डॉ. पी.पी. फडणीस यांनी केले. आभार-प्रदर्शन सहाय्यक प्रा. डॉ. आर.जे. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रा. करिश्मा कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थींनी व विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.