no images were found
व्यापारी, रहिवासी नागरिकांना विश्वासात घेवूनच श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करू :राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच प्रशासनाला दिल्या असून, नागरिकांनी व व्यापारी बांधवांवर कोणताही अन्याय होणार नाही. सर्वांना विश्वासात घेवूनच श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनच्या सभासदांना आश्वासित केले. संघटनेच्या वतीने आज श्री.क्षीरसागर यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनने सादर केलेल्या निवेदनात, मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवासी नागरिकांना तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसर हा मुळचा गावठाण भाग असून, राजर्षी शाहू महाराजांनी सामान्य जनतेसाठी निर्माण केलेल्या बाजार पेठांमधील महाद्वार रोड ही बाजारपेठ कोल्हापूरचे हृदय आहे. त्यामुळे यास धक्का न लावता श्री.अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करावा. श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना सोई सुविधा मिळणे गरजेचेच आहे. पण कोणावरही अन्याय करून विकास करण्यात येवू नये. सर्वांना विश्वासात घेवून निर्णय व्हावा, अशी मागणी करत संघटनेचा विकासाला विरोध नसल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी श्री तिरुपती, श्री सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसराचा विकास व्हायला हवा. मात्र हा विकास साधताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. सुरुवातीला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तपासणी करुन विकासासाठी ताब्यात घ्याव्यात, उर्वरित कामांसाठी गरज भासल्यासच खासगी जागांचा विचार व्हावा, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. याविषयी व्यापारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार राज्यस्तरावर बैठकीसाठी प्रयत्न करण्यात येतील. श्री अंबाबाई मंदिराचा विकास झाल्यास कोल्हापूरच्या अर्थचक्राला गती प्राप्त होणार आहे. यातून पर्यटन वाढीसह रोजगाराची संधीही निर्माण होणार आहे. पण, हे होत असताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही. त्यामुळे व्यापारी व रहिवासी नागरिकांनी निश्चिंत व्हावे. राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे सर्वाना विश्वासात घेवूनच हा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान समितीचे मा.अध्यक्ष महेश जाधव, कॉ.चंद्रकांत यादव, संघटनेचे अध्यक्ष शामराव जोशी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्ये, सचिव डॉ.गुरुदत्त म्हाडगुत, संचालक राहुल नष्टे, राकेश माने, सागर कदम, दिलीप धर्माधिकारी, शुभला वणकुद्रे, अलका सुगंधी, प्रतिभा वाकरेकर आदी उपस्थित होते.