
no images were found
पत्नीसह मुलांना कालव्यात ढकलून त्याने संपवले स्वतःचे जीवन
कोल्हापूर : कागलमधील कसबा सांगाव येथे कौटुंबिक कलहातून पत्नीसह मुलांना कालव्यात ढकलून स्वतःही जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे रहिवासी संदीप पाटील यांनी कुटुंबाला कालव्यात ढकलून देत स्वतःसह कुटुंबाचेही जीवन संपवले. या घटनेत सुदैवाने १३ वर्षाची मुलगी बचावली आहे. संदीप पाटील, राजश्री पाटील आणि सन्मित पाटील अशी मयतांची नावे आहेत..
संदीप पाटील हे साऊंड सिस्टीमच्या व्यवसायासोबत शेतीही करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. संदीप शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरुन घरुन निघाला. कसबा सांगाव येथील दूधगंगा डाव्या कालव्याजवळ येताच त्याने पत्नी आणि दोन मुलांना कालव्यात ढकलले. यानंतर स्वतः निपाणी तालुक्यातील भोज येथे जाऊन जीवन संपवले.
यात सुदैवाने बचावलेली मुलगी दुपारच्या सुमारास कालव्याच्या कठड्यावर रडत मदतीची याचना करत असल्याचे काही लोकांनी पाहिले. नागरिकांनी तिला बाहेर काढले. यानंतर कागल पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध घेतला असता कालव्यात आई आणि मुलाचे मृतदेह सापडले. यानंतर संदीपचा शोध घेण्यात आला.
शोध घेत असतानाच संदीपने भोज येथे आत्महत्या केल्याचे कळले. या घटनेत बचावलेल्या मुलीच्या डोक्याला मार लागला आहे. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कागल पोलिसात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संदीपने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले हे अद्याप कळू शकले नाही. कागल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.