
no images were found
पत्राचाळीचा बेहिशेबी पैसा ‘ठाकरे’ सिनेमात गुंतवला?
गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीच भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून ‘ठाकरे’ सिनेमा काढला होता. राऊतांनी या सिनेमात बेहिशोबी पैसे वापरले असल्याची माहिती उघड झाली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाले. त्यात राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा झाले असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला चौकशीत सांगितले की, संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून जो ‘ठाकरे’ सिनेमा काढला त्यामध्ये राऊतांनी बेहिशोबी पैशाचा वापर केलेला असून एप्रिल २०२१ मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत असा दावा देखील करण्यात आला आहे. जानेवारी २०१५ मध्ये मराठी सिनेमा बाळकडू रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा कुठल्याही लाभाशिवाय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली म्हणून काढण्यात आला. मात्र या सिनेमानं ६० लाख रुपये निव्वळ नफा कमवला. त्यापैकी राऊतांनी ५० लाख रुपये माझ्या बँक खात्यातून मला चेक देण्यास भाग पाडले. त्यांच्या नावाने धनादेश काढला. या सिनेमासाठी संजय राऊतांचं कुठलेही योगदान नव्हतं. त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून ५० लाख रुपये घेतले अशी माहिती स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिली आहे.
पत्राचाळीच्या कथित घोटाळ्याचा पैसा राऊतांनी कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवला असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.