Home मनोरंजन  संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने कलावंत सन्मानित, महाराष्ट्रातील १२ जण

 संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने कलावंत सन्मानित, महाराष्ट्रातील १२ जण

29 second read
0
0
37

no images were found

 संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने कलावंत सन्मानित, महाराष्ट्रातील १२ जण

नवी दिल्ली : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशातील  १२८ कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील १२ कलावंताचा समावेश आहे.

        येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

        या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सन २०१९ सन २०२० आणि सन २०२१ असे तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून एकूण १२८ कलावंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात विविध कला क्षेत्रातील ५० महिलांचा समावेश आहे. अकादमी रत्न सदस्यता पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.

        पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी ‘अकादमी रत्न सदस्यता’ या संगीत अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यातून नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील त्यांच्या सर्वंकष योगदानासाठी गौरविण्यात आले. याबरोबरच  लोक संगीतकार पांडुरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी नर्तक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समकालीन नर्तक भुषण लकंद्री यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.

         वर्ष २०१९ साठी महाराष्ट्रातील दिग्दर्शन क्षेत्रात योगदान देणारे कुमार सोहोनी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर श्री सोहोनी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्ष झाली असून याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे हा यथोचित सन्मान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. लोक संगीत क्षेत्रात योगदान देणारे पांडुरंग घोटकर यांना  सन २०१९ च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . सन २०१९ साठीचे सतारमेकर मजीद गुलाबसाहेब यांना वाद्य निर्मितीच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

         सन २०२० साठीच्या पुरस्कारांमध्ये नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वकष योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने  गौरविण्यात आले. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना सन २०२० च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

         सुप्रसिद्ध सिने तथा नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत श्री. दामले म्हणाले, मराठी नाटकात काम करण्याचा प्रचंड अभिमान आहे. नाटक हे टिम वर्क असून माझ्यासह निर्माते, सहकलाकार, कुटुंबाचे सदस्य, रसिक प्रेक्षक ते महाराष्ट्रातील, भारतातील वा संपूर्ण जगभरात पसरलेले मराठी नाट्य प्रेमी यांचाही या पुरस्कारात तितकाचा वाटा आहे. आज हा मिळालेला पुरस्कार या सर्वांच्यावतीने मी घेत असल्याचे ते म्हणाले. सोबतच तरूण पिढीला आवाहन करत म्हणाले, चांगल्या कामाचा आनंद आणि पैसे दोन्ही मराठी नाटक देते.

     सन २०२० साठी अभिनेत्री, दिग्दर्शिका कळसुत्रीकार मीना नाईक यांना कळसुत्रीच्या माध्यमातून समाज जागृती तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर नाटक बसविण्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला. सुगम संगीतातील ख्यातनाम गायक अनूप जलोटा यांना संगीत क्षेत्रातील अन्य प्रमुख परंपरा अंतर्गत येणाऱ्या सुगम संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा मानाचा सन २०२०साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी सन २०२० चा पुरस्कार मुंबईतील रबिंद्र कुमार अतिबुद्ध‍ि यांना प्रदान करण्यात आला. तसेच अहमदनगरचे भूषण लकंद्री यांना समकालीन नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष २०२१ साठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…