
no images were found
आता गुढीपाडवा आणि डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्तही ‘आनंदाचा शिधा’
मुंबई : दिवाळीसारखाच आता गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रास्तधान्य दुकानावर ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. याचा लाभ राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल.
यापूर्वी दिवाळीत वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधामध्ये १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तूंचा समावेश होता. आताही १ कोटी ६३ लाख रेशनकार्डधारकांना हा १०० रुपयांचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना, अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे १ कोटी ६२ लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिधा दिवाळीनंतर मिळाला होता. यावेळी तो सणापूर्वी मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.